Jalgaon : डंके की चोट पे सांगतो, पुन्हा निवडून येईन; शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांचा विश्वास
Jalgaon News Update : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर किशोर पाटील शिंदे गटात गेले. परंतु, त्यांच्या भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना न सोडता उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या आहेत.
Jalgaon News Update : डंके की चोट पे सांगतो, पुन्हा आमदार म्हणून निवडून येईन आणि हॅट्रृीक करेन, असा विश्वास शिंदे गटाचे जळगावधील पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांनी दिलंय. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने किशोर पाटील यांच्याशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
"गेल्या 20 वर्षापासून विकासकामांच्या माध्यमातून जनतेला सामोरं जात आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे समर्थकांनी आम्हाला कमी समजू नये. या मतदार संघात आतापर्यंत कुणाला जनतेने दोन वेळा निवडून दिलेले नाही. मात्र, आतापर्यंत दोन वेळा याच विकासकामांच्या जोरावर जनतेने मला निवडून दिलं. आता पुन्हा निवडून येईन आणि आमदारकीची हॅट्रृीक करेन असं आमदार किशोर पाटील यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर किशोर पाटील शिंदे गटात गेले. परंतु, त्यांच्या भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना न सोडता उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या आहेत. यावर बोलताना पाटील म्हणाले, "हा काही नवा इतिहास नाही. पक्ष कुठलाही संपत नाही, थांबत नाही, मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, त्यामुळं मला मागे पाहण्याची वेळ जनता येवू देणार नाही."
आगामी निवडणुकीत वैशाली सुर्यवंशी या किशोर पाटील यांना आव्हान देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, "राजकारणात भावना चालत नाहीत. मात्र, तरीही मी नातं सांभाळेन, परंतु, माझे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मी त्या पध्दतीने सामोरे जाईन. आम्ही वेगवेगळ्या पक्षासाठी निवडणुका लढवू. मात्र, बहीण भावाचं नातं सांभाळणार आहे. राजकीय वाटचालीसाठी वैशाली यांना माझे आशीर्वाद आहेत, तसेच तिचे देखील मला आशीर्वाद आहेत."
दरम्यान, कालच पोचारा येथील शिवसेना संपर्क कार्यालयातील किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले गेले असून, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचे फलक लागले आहेत. त्यामुळं किशोर पाटील यांना त्यांचं शिवतीर्थ शिवसेना कार्यालय खाली करावं लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या