Gulabrao Patil : नोकरी अन् छोकरी एवढंच आपलं स्वप्न होतं, राजकारणात चुकून आलो; गुलाबराव पाटलांची कबुली
Gulabrao Patil : 'मी राजकारणात यावे, असे माझे कधी स्वप्न नव्हते की राजकारणाची आवड देखील आपल्याला नव्हती', असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव : मी राजकारणात यावे, असे माझे कधी स्वप्न नव्हते की राजकारणाची आवड देखील आपल्याला नव्हती, मात्र महाविद्यालयीन जीवनात आपल्याला नाटक कलाकार म्हणून छंद होता. त्यातून चांगलं बोलण्याची कला अवगत होती. त्यामुळे नोकरी आणि छोकरी एवढंच माझं स्वप्न होते, मी राजकारणात चुकून आल्याची कबुली राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी युवारंग कार्यक्रमात दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, त्यावेळी आपल्या गावात नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा आपल्या गावात स्थापन झाली होती. या शाखेत आपण यावे आणि आपण तरुणांना संबोधित करावे असे अनेकांना वाटत होते. त्यातूनच आपला राजकारणात प्रवेश झाला आणि कधी नव्हे ते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली आणि आपण राजकारणात (Politics) घट्ट रोवलो गेले. याच खर श्रेय आपल्या महाविद्यालय जीवनात आपण अवगत केलेली वकृत्व कला आणि नाटक याला जात. राजकारणात ही आपल्याला नेहमी या दोन्ही गोष्टींचा उपयोग झाला आहे. नाहीतर शिक्षण घेऊन नोकरी आणि छोकरी एवढेच आपले स्वप्न होते, अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात विद्यार्थ्यांच्या समोर दिली आहे.
गुलाबराव पाटील हे नेहेमीच आपल्या वक्तृत्व शैलीमुळे सर्वपरिचित आहेत. आपल्या भाषणात अनेकदा शेरोशायरीसह अनेक उदाहरणे ते देत असतात. त्यामुळे जळगावचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ते आपल्या शैलीमुळे ओळखले जातात. नुकतंच त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेल्या युवारंग महोत्सवात कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू फुलल्याचे पाहायला मिळाले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी महाविद्यालयीन आठवणींना वाट मोकळी करून दिली. महाविद्यालयीन काळात आपण ज्या गोष्टी शिकतो, त्याच पुढे भविष्यात कामी येतात. वक्तृत्व कला असेल, नाटक कलाकारी असेल यामुळे आपल्याला समाजात एक ओळख देण्याचे काम होत असते. माझ्याकडे वक्तृत्व कला असल्याने मी राजकारणात गेलो, मात्र राजकारण हा मार्गच नव्हता, पण आता महाविद्यालयांत शिकलेल्या गोष्टीचा आता राजकारणात उपयोग होत असल्याचे ते म्हणाले.
उमवित युवारंग महोत्सव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवारंग 2023 खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत दिनांक 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यामधून सुमारे 1400 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असून पहिल्या दिवशी 7 रोजी सांस्कृतिक पथसंचलन दुपारी चार वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाले. या युवारंग युवक महोत्सवात संगीत, वाद्य, नृत्य, वाङ्मयीन कला प्रकारात वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा रंगमंच या कला प्रकारात नक्कल, मुकाभिनय, प्रहसन आणि ललित कला प्रकारात स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्र, इन्स्टॉलेशन, मेहंदी या विषयांवर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. तर या कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
इतर महत्वाची बातमी :