(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Crime News : जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञातांनी पेटवून दिला; घटनास्थळी पोलीस दाखल
Crime News : विशेष म्हणजे संबंधित टोल नाका आजपासून सुरु होणार होता, मात्र त्यापूर्वीच झालेल्या हल्ल्याच्या घटनेने चर्चेला उधाण आले आहेत.
Crime News : जळगाव-धुळे रस्त्यावर (Jalgaon-Dhule Highway) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बुरखाधारी तरुणांनी टोल नाक्याची तोडफोड करून पेटवून दिला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे संबंधित टोल नाका आजपासून सुरु होणार होता, मात्र त्यापूर्वीच झालेल्या हल्ल्याच्या घटनेने चर्चेला उधाण आले आहेत.
चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात बुरखाधारी तरुणांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला सब गव्हाण येथील टोलनाका तोडफोड करून पेटून दिला आहे. त्यानंतर हे तरुण पसार झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे. तोडफोड आणि जाळपोळची संपूर्ण घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा हा टोल नाका होता.
टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान
आजपासून पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील टोल नाका सुरु केला जाणार होता. अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा हा टोल नाका होता. त्यामुळे आज उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याची सर्व तयारी झाली होती. उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका वसुलीसाठी सुरु करण्यात येणार होता. मात्र, आदल्या रात्रीच अज्ञात लोकांनी हल्ला करत टोल नाका पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी काही कर्मचारी टोल परिसरात झोपले होते. टोलवर आग लागल्याचं दिसताच त्यांनी पोलिसांना कळवले. या सर्व घटनेत टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध
आजपासून सुरु होणाऱ्या सब गव्हाण गावातील टोल नाक्यावर रात्री काही कर्मचारी झोपलेले होते. मात्र, मध्यरात्री अचानक आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे याची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच, या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही कैद झालेल्या तरुणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
उद्घाटनापूर्वी हल्ला...
पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील टोल नाक्यावर झालेल्या हल्ल्याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे हा टोल नाका आजपासून सुरू होणार होता. यासाठी सर्व तयारी झाली होती. मात्र, त्यापूर्वीच चार चाकीमधून आलेल्या दोन तरुणांनी संबंधित टोल नाका पेटवून दिल्याने ही सर्व घटना संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टोल नाका पेटवून देण्यामागे नेमका काय हेतू होता? याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Jalgaon News : जळगावातील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; निवडणुकीपूर्वीच 'राजकीय धमाका' होणार