Gulabrao Patil : तुम्ही हवं तर 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीनुसार 50 लढतो, पण युती करा, नाहीतर कार्यकर्ते मरतील; गुलाबराव पाटलांचे भाजपला आवाहन
jalgaon Election : पहिल्या वेळेस निवडून येता येते, ते सोपं असतं. मात्र सलग तीन चार वेळा निवडून आला तो खरा नेता असतो असं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक (Jalgaon ZP Election) ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो पण युती करा असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपला केलं. युती जर केली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील असं ते म्हणाले. तसेच विरोधकांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शनक असते, गेली वर्षभर झालं आम्ही गद्दार असल्याची टीका सहन करतोय असंही ते म्हणाले. जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही? असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटील यांनी विचारला. दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण युती करा असं आवाहन गुलाबरावांनी केलं.
Gulabrao Patil On Yuti : युती झाली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील
भाजपावाले एकीकडे आपल्याला युती करायचं असं सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. त्यामुळे भाजपावाल्यांना आपले सांगणे आहे, जिल्हा परिषद निवडणुकात ते वेगवेगळेचे वारे करत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते मरून जातील. तुम्ही शंभर जागा लढले तर आम्ही पन्नास तरी लढू. दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठे करण्याची हीच निवडणूक संधी असते. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे.
Gulabrao Patil On Election : विरोधक हे होकायंत्राप्रमाणे मार्गदर्शक
गुलाबराव पाटील म्हणाले की, "राजकारणात विरोधक असायला हवे, तरच राजकारण चालेल. विरोधक हे होकायंत्राच्या प्रमाणे असतात. त्यांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असल्याने फायद्याची ठरते.आमच्यावर विरोधक किती टीका करतात. लोक हुशार झाले आहेत, पहिल्या वेळेस निवडून येता येते. मात्र सलग तीन चार वेळा निवडून आला तो खरा नेता असतो."
आमच्यावर गद्दार म्हणून नेहमीच टीका झाली आहे, अजूनही होत आहे. आमचं काम आहे टीका ऐकण्याचं असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
























