Girish Mahajan on Uddhav Thackeray : 'ती' एक चूक उद्धव ठाकरेंच्या आयुष्यभर मनात राहणार; गिरीश महाजनांची बोचरी टीका
Girish Mahajan : भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी खूप मोठी चूक केली आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंची चूक कधीही भरून निघणार नाही, अशी टीका गिरीश महाजनांनी केली.
Girish Mahajan जळगाव : आज सर्वत्र गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जळगावातही सालाबादाप्रमाणे ध्वज व गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) माध्यमांशी संवाद साधताना मी बाल स्वयंसेवक होतो, तेव्हापासून आवर्जून पथसंचलनात हजर असतो असे म्हणत गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबतही गिरीश महाजनांनी भाष्य केले आहे.
...त्याबाबत राज ठाकरे स्वतःच जाहीर करतील
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. यात राज ठाकरे (Raj Thackeray) नेमकी काय भूमिका घेणार? ते महायुत्ती सहभागी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर गिरीश महाजन यांना विचारले असता महायुतीत सहभागी व्हायचं किंवा नाही. हे राज ठाकरे स्वतः जाहीर करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
खडसेंच्या घरवापसीबाबत मला कुठलीही माहिती नाही
एकनाथ खडसे (Eknath Khadse) लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, खडसेंच्या घरवापसीबाबत मला कुठलीही माहिती नाही. त्यांनी सांगितलं की, माझा खाली कुठेही संपर्क नाहीये. खडसेंची वरती डायरेक्ट हॉटलाईन आहे. प्रवेशाबाबत त्यांनाच माहिती असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी खूप मोठी चूक केली
उद्धव ठाकरे यांच्याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी खूप मोठी चूक त्यांच्या आयुष्यात केली. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. थोड्याशा मोहापायी उद्धव ठाकरेंनी केलेली एक चूक आयुष्यभर त्यांच्या मनात राहणार आहे. राजकीय जीवनात उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. ती कधीही भरून न निघणारी आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
जळगाव, रावेरमध्ये आम्ही विक्रम करू
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या (Jalgaon, Raver Lok Sabha Constituency) निवडणुकीबाबत गिरीश महाजनांना विचारले असता जळगाव आणि रावेर लोकसभा हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. या लोकसभेत (Lok Sabha Election 2024) आम्ही विक्रम करू. पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य दोन्हीही जागांवर राहील, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा