(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींचं काम चांगलं असल्याचा साक्षात्कार खडसेंना आताच कसा झाला?, गिरीश महाजनांनी पुन्हा डिवचलं
Girish Mahajan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासचे व्हिजन पाहून आपण भाजपमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. यावरून गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Girish Mahajan on Eknath Khadse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विकासचे व्हिजन पाहून आणि त्यांच्यावर असलेला विश्वास पाहून आपण भाजपमध्ये (BJP) परत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले होते. त्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे काही दिवसांपूर्वीच मोदी यांच्या बद्दल काय काय बोलत होते. त्याच्या क्लीप आपण दाखवू शकतो. मोदी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले आहेत. भाजपामध्ये असताना तीस वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले आणि एक वेळेलाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला आहे. लगेच पार्टी बदल तुम्ही केला. मग आता कसा तुम्हाला मोदी यांचा काम चांगलं असल्याचा साक्षात्कार झाला हे कळत नाही.
शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला ही आपली मोठी चूक झाली असल्याची कबुली शरद पवार यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांच्याकडे दिली होती. या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की, बरोबर आहे. त्यांचं काही चूकच नाही. कारण खडसे यांनी आपल्या सोईचे राजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोईचे आणि एकाच घरात सत्ता राहणारे, परिवार वादाचे राजकारण त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच आहे.
अद्याप खडसे यांचा भाजपा प्रवेश झालेला नाही
एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये होऊ घातलेल्या प्रवेशाबाबत भाजपावर टीका केली आहे आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध दर्शविला आहे, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले. त्यांचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावला आहे. अद्याप खडसे यांचा भाजपा प्रवेश झालेला नाही किंवा त्यांना राज्यपाल केले जाणार असल्याचं मला माहित नाही. पक्षाने त्यांना अस सांगितले नाही. अशी गरज सुद्धा पक्षाला नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
...म्हणून श्रीराम पाटलांना दिली उमेदवारी
रावेर लोकसभा मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांना शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी आमच्याकडे दोन महिन्यापूर्वी आलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारीसाठी गळ घालून त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र रावेर असो किंवा जळगाव या दोन्ही ठिकाणी आमच्या उमेदवाराला पाच लाखांचा लीड मिळेल, असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येत्या निवडणुकीत त्यांनी लढून दाखवा मग कळेल
उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना आपल्याला खोलात जायला लाऊ नका, अन्यथा जामनेरमध्ये फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी त्यांना प्रतिआव्हान दिले आहे. खोलात जायचं की खड्ड्यात जायचे जितके जायचे तितके जा, कुठेही जावं, घोडा मैदान समोर आहे. येत्या निवडणुकीत त्यांनी लढून दाखवा मग कळेल आपली लोकप्रियता किती आहे. आपण किती मोठे आहात ते कळेल, असे म्हणत त्यांनी उन्मेष पाटलांना डिवचले आहे.
आता घोडा मैदान समोर
माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी गिरीश महाजन हे हवेत आहेत किंवा त्यांनी पाच लाख मतांचा घोटाळा केला असावा म्हणून ते पाच लाख मतांनी लीड मिळेल अस सांगत असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी म्हटल आहे की, शेवटी ते आमचे विरोधक आहेत ते टीका करणारच, आता घोडा मैदान समोर आहे. त्यांनी समोर यावे, ताकदीने लढावे आणि मत मोजावी, मग कळेल की मतपेट्या बदलल्या की नाही. पराभव दिसू लागले तर पेट्यामध्ये घोटाळा केला अस ते सांगू शकतात मात्र त्यांच्या आरोपात कुठेही तथ्य नाही. त्यांनी लढून दाखवावे आणि मग काय ते सांगावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा