(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Crime News: जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Jalgaon Crime News: जळगावातील धरणगाव तालुक्या बांभोरीमधील नदीपात्राशेजारी एका तरुणाची हत्या करण्यात आली. दरम्यान पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
Jalgaon Crime News: जळगावमधील (Jalgoan) बांभोरी गावातील आशिष शिरसाळे या तरुणाची डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे. जेवण झाल्यानंतर हा तरुण गावापासून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदीपात्रात शौचाला गेला तेव्हा 22 वर्षीय आशिषच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या हत्येमुळे संपूर्ण बांभोरीसह जळगाव जिल्ह्यामध्ये भीताचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
बांभोरी गावातील शनिवार पेठेमध्ये आशिष हा त्याच्या आई-वडील आणि मोठ्या भावासह राहत होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. तर आशिष आणि त्याचा भाऊ दोघेही गावामध्ये मोलमजूरी करुन त्यांचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास आशिष हा जेवण झाल्यानंतर शौचास गेला होता. अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मागून त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने घाव घातला. अंधार असल्यामुळे आशिषला फारसे काही दिसले देखील नाही. दरम्यान त्या व्यक्तीने लगेच घटनास्थळावरुन पळ काढला. बराच वेळ आशिष घरी न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने ते गिरणा नदीपात्रात रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सापडला.
पोलिसांनी संशयितांना घेतलं ताब्यात
पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आशिषला परिसरातील नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आशिषच्या घरच्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तसेच आपला तरुण मुलगा गमावल्याने त्याचे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
परंतु आशिषची हत्या कोणी केली आणि त्याचा यामागचा नेमका उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास देखील करण्यात येत आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरुन काही अंतरावर आशिषचा मोबाईल तुटलेल्या अवस्थेमध्ये सापडला. पोलिसांकडून याप्रकरणात अधिक चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. परंतु अद्यापही या हत्येमागचं कारण समजू शकले नाही. त्यामुळे नेमकी ही हत्या कशामुळे झाली हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Crime News : बांध कोरल्यावरून झाला वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याचा केला घात