(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yasin Malik: दहशतवाद्यांना आर्थिक मदत; फुटीरतावादी यासिन मलिक दोषी, NIA कोर्टाचा निकाल
Yasin Malik : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी आढळला आहे.
Yasin Malik Convicted : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवले आहे. एनआयए कोर्टाने आज निकाल सुनावला. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती.
यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल होते.
मागील सुनावणीत यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने कोर्टाला सांगितले की, त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे म्हटले.
यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते.
कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.
जन्मठेपेची शिक्षा?
यासिन मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांनुसार यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासिन मलिकला 25 मे रोजी एनआयए विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.