Wrestler Protest: कुस्तीपटूंचं स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र; काय केलीये मागणी?
Wrestler Protest News: आम्ही येथे धरणं धरून 22 दिवस झाले, पण आजपर्यंत भाजपचे कोणीही आमच्याकडे आले नाहीत, कुस्तीपटूंनी मागितला भाजप महिला खासदारांचा पाठिंबा.
Wrestler Protest News: गेल्या 22 दिवसांपासून जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे कुस्तीपटूंनी महिला खासदारांचा पाठिंबा मागितला आहे, जेणेकरून बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई करता येईल.
'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा (Beti Bachao Beti Padhao) नारा देणाऱ्या या महिला खासदारांनीही आमच्या दु:खात सहभागी होऊन आम्हाला साथ द्यावी, असं आवाहन कुस्टीपटूंनी पत्रातून केलं आहे. एवढंच नाही तर 16 मे रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयांवर एकदिवसीय सत्याग्रह करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
22 दिवस धरणं आंदोलन सुरूये : विनेश फोगाट
जंतरमंतरवर पत्रकारांना संबोधित करताना विनेश फोगट म्हणाली की, आम्हाला येथे धरणं देऊन 22 दिवस झालेत, परंतु आजपर्यंत भाजपचं कोणीही आमच्याकडे आलेलं नाही. एकही महिला खासदार आलेली नाही, जे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देतात, ते या दु:खात सहभागी झाले नाहीत. सोमवारी आम्ही भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र लिहून मदत मागणार आहोत. आमचे कुस्तीपटू पत्र त्यांच्या घरी पोहोचवतील.
आमच्या लढ्यात आम्हाला साथ द्या : साक्षी मलिक
कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही समाजातील सर्व लोकांचा पाठिंबा मागतोय. आमच्या लढ्यात सामील व्हा. आम्ही जे आरोप करत आहोत, ते खरे आहेत. म्हणूनच तुम्ही सर्वजण आमच्या पाठिंब्याला आलात. आमच्या समर्थनार्थ जंतरमंतर येथे दररोज काही लोक यावेत. याशिवाय विनेश फोगाटनं 16 मे रोजी आमच्या समर्थनात एक दिवसाचा सत्याग्रह करावा असं आवाहन केलं आहे. तसेच, आपापल्या जिल्हा मुख्यालयात जाऊन निवेदन द्या, असंही त्यांनी सांगितलं आहे.
काय लिहिलंय पत्रात...
कुस्तीपटूंनी त्यांच्या पत्रात लिहिलंय की, "भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी आम्हा भारतातील महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला आहे. फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या त्यांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी अनेकवेळा कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केले आहेत. अनेक कुस्तीपटूंनी याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या ताकदीपुढे कोणाचंच काही चालंल नाही. अनेक कुस्तीपटुंचं भविष्य उद्ध्वस्त झालं."
डोक्यावरुन पाणी जातंय...
कुस्तीपटूंनी आपल्या पत्रात पुढे असं लिहिलंय की, "आता नाकाजवळ पाणी गेल्यानं महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. आम्ही आमचं जीवन आणि खेळ बाजूला ठेवून आमच्या प्रतिष्ठेसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 22 दिवसांपासून जंतरमंतरवर आम्ही न्यायासाठी लढा देत आहोत. आमच्या निरीक्षणानुसार, त्यांच्या शक्तीनं प्रशासनाचा कणाच मोडला नाही तर आमच्या सरकारलाही आंधळं केलं आहे."
महिला कुस्तीपटूंनी पत्रात म्हटलंय की, सत्ताधारी पक्षाच्या संसदेच्या महिला सदस्या या नात्यानं आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे. न्यायासाठी आमचा आवाज आणि आमची प्रतिष्ठा वाचवा. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, जंतरमंतरवर येण्यासाठी तुम्ही थोडा वेळ नक्की द्यावा.