World Radio Day | कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणारा रेडिओ...
World Radio Day 2021: आजही रेडिओची सिग्नेचर ट्यून कोट्यवधी लोकांच्या मनात घर करुन आहे. भारतात रेडिओची सुरुवात सर्वप्रथम 1927 साली मुंबईत करण्यात आली.
World Radio Day 2021: आजच्या प्रमाणे इंटरनेटचा विकास न झालेल्या काळात रेडिओ हेच एक मनोरंजन आणि शिक्षणाचे माध्यम होतं. आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातोय. दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातोय. 2011 साली यूनेस्कोकडून या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. या वर्षीच्या जागतिक रेडिओची थीम ही 'New World, New Radio' अशी आहे.
आज जागतिक रेडिओ दिवसाचा 10 वा वर्धापन दिन आहे. रेडिओचा इतिहास पाहिला तर जवळपास 110 वर्षांच्या मागे जातोय. इंटरनेटच्या काळात आजही रेडिओ आपले महत्व टिकवून आहे. पूर्वीच्या AM वरुन त्याचे स्वरुप बदलून आता ते FM मध्ये रुपांतरीत झाल्याचं पहायला मिळतंय.
एके काळी ऑल इंडिया रेडिओ किंवा आकाशवाणीचे कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानीच असायची. विविध भारतीचे कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारे असायचे. भारतात रेडिओची सुरुवात 1927 साली मुंबई आणि मद्रास या ठिकाणी झाली. मुंबई केंद्राचे पुढे 1936 साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण रुपांतर झाले. तेव्हापासूनचा आजपर्यंतचा रेडिओचा प्रवास थक्क करणारा आहे.
भारतीय स्वातंत्र्यामध्ये रेडिओचाही खारीचा वाटा आहे. स्वांतत्र्यानंतर रेडिओ हेच एकमेव माध्यम असं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकत होतं. ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतरीत्या आकाशवाणी हे नाव 1957 साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. त्या काळात रेडिओने देशाच्या विकासात महत्वाचं योगदान बजावल्याचं दिसतंय.
79 वर्षांपूर्वी लतादिदींनी गायलं रेडिओवर पहिलं गाणं, आठवण सांगत केलं ट्वीट
सिग्नेचर टयून: आकाशवाणीची ओळख आकाशवाणी प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला सिग्नेचर टयून असं म्हटलं जातं. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. 1930 च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील आपली आवड, कामगार सभा, युववाणी, भावसरगम, वनिता मंडळ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या. सकाळचे ठीक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई कामगार सभा आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची कामगारांसाठी अशी सूचना येई आणि मग दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय सिग्नेचर ट्यून कानावर पडे.
मन की बात श्रोत्यांच्या मनातील खऱ्या अर्थाने जर कोण बोलत असेल तर ते आकाशवाणी हेच आहे. भारतातील कानाकोपऱ्यात पोहचलेलं एकमेव माध्यम अशी या रेडिओची ओळख आहे. म्हणूनच आपल्या मन की बात या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेडिओची निवड केल्याचं पहायला मिळतंय.
Happy World Radio Day! Greetings to all radio listeners and kudos to all those who keep the radio buzzing with innovative content and music. This is a fantastic medium, which deepens social connect. I personally experience the positive impact of radio thanks to #MannKiBaat.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2021
जरी 1990 च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी आकाशवाणी आपली लोकप्रियता टिकवून आहे.
भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे पुण्यात निधन