(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Teachers Day 2020 | शिक्षक दिन : काय आहे इतिहास?
भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवशी शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते.
मनुष्याच्या आयुष्यात त्याचा गुरू अर्थात शिक्षकाचे स्थान मोठं आहे. शिक्षक हा मनुष्याच्या आयुष्याला आकार देतो आणि त्या शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील बहुमूल्य योगदान लक्षात घेता जगभर 5 ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, भारतात शिक्षक दिन हा दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
भारतात शिक्षक दिन हा थोर शिक्षणतज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे जावून भारताचे दुसरे राष्ट्रपती बनलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
1962 साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती बनले. ते त्यांच्या विद्यार्थी आणि मित्रपरिवारात फारच प्रिय होते. त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी राधाकृष्णन यांना त्यांचा वाढदिवस साजरा करू देण्याची विनंती केली. त्यावर राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास तो त्यांचा सन्मान ठरेल अशी विनंती केली. यावरून राधाकृष्णन यांची शिक्षण आणि शिक्षकांप्रती निष्ठा आणि समर्पण दिसून येते. त्या दिवसापासून 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
असे मानले जाते की देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या हातात असते. पण या मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं महत्वपूर्ण काम हे शिक्षक करतात आणि त्यांनी केलेल्या या कामावरच देशाचं भविष्य ठरतं. शिक्षक विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यास मदत करतातच पण त्यापेक्षाही पुढे जावून ते विद्यार्थ्यांना एक जबाबदार आणि आदर्श नागरिक म्हणून कसे जगायचे, आयुष्यातील आव्हानांना कसे सामोरे जायचे याचे महत्वपूर्ण ज्ञान देतात. चांगला समाज घडवण्यात शिक्षकांचे योगदान लक्षात घेता त्यांचा सन्मान म्हणून जगभर शिक्षक दिन साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षणतज्ञ, विख्यात मुत्सद्दी आणि या सगळ्यात आधी महान शिक्षक होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठं आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांत नृत्य,गायन, शिक्षकांची मिमिक्री करणे अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी त्या दिवशी विद्यार्थी हे शिक्षकाच्या भूमिकेत जातात. त्या दिवशी आपल्या आवडत्या शिक्षकांना भेटवस्तू दिल्या जातात. या सगळ्यातून विद्यार्थी हे आपल्या शिक्षकांप्रती असणारे प्रेम व आदर व्यक्त करतात.
या सगळ्या गोष्टीतून शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. मनुष्य कितीही मोठा झाला तरी या दिवशी तो शाळेतील वा महाविद्यालयातील आपल्या आवडत्या शिक्षकांना शुभेच्छा देण्यास विसरत नाही.
या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये सुरू नसल्याने शिक्षक दिन कशा प्रकारे साजरा होतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.