WHO Director in Gujarat : डब्ल्यूएचओ प्रमुखांचा गुजरात दौरा, पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार
WHO Director in Gujarat : डब्ल्यूएचओ प्रमुख आज गुजरातला येणार असून नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. तसेच, विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.
WHO Director in Gujarat : WHOच्या प्रमुखांचा आज भारत दौरा आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि WHO प्रमुखांची भेट होणार आहे. तर मोदींसोबत घेब्रेसियस देखील गुजरातमधील काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यावेळी कोरोनाचं केंद्र मानलं जाणाऱ्या चीनवर जगभरातून टीकेची झोड उठवली जात होती. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस (Tedros Adhanom Ghebreyesus)तेव्हापासूनच वादाच्या भोवऱ्यात होते. हेच डब्ल्यूएचओ प्रमुख आजपासून गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, सध्या देशात कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणीवरुन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच WHO प्रमुखांचा गुजरात दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि WHO प्रमुखांची भेट होणार आहे. पंतप्रधान मोदींसह घेब्रेसियसही काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. घेब्रेसियस 18 एप्रिलला राजकोटला येणार आहेत. यानंतर ते जामनगरमध्ये मोदींची भेट घेतील. इथे पारंपरिक औषधांचे डब्ल्यूएचओकडून जागतिक केंद्र सुरु केले जाणार आहे.
मोदींचा गुजरात दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातला निवडणुकीच्या वर्षात पंतप्रधानांकडून मोठी भेट मिळणार आहे. 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंतप्रधान मोदी विविध क्षेत्रातील 22 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान गांधीनगरमधील शाळांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधतील. त्यानंतर त्याचं लोकार्पण करतील. तसेच बनासकांठा येथील देवदार येथील बनास डेअरी कॉम्प्लेक्समध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. यानंतर, दुपारी 3.30 वाजता ते जामनगरमध्ये WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीनची पायाभरणी करतील.
गुजरातला 22 हजार कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण
कमांड अँड कंट्रोल सेंटर दरवर्षी 500 कोटींहून अधिक डेटा संच संकलित करते आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण परिणाम वाढवण्यासाठी व्यापक माहितीचे विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) आणि मशीन लर्निंग वापरून त्यांचे अर्थपूर्ण विश्लेषण करते. केंद्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाइन उपस्थितीचा मागोवा घेण्यास मदत करते, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामाचे केंद्रीकृत सारांश आणि नियतकालिक मूल्यांकन करते. शाळांसाठी कमांड आणि कंट्रोल सेंटरला जागतिक बँकेने जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट पद्धतींपैकी एक म्हणून ओळखलं आहे. तसेच इतर देशांना देखील याबद्दल जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM Modi : आजपासून पंतप्रधान मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर, 22 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण