एक्स्प्लोर
भारतात पहिला डिजिटल कॅमेरा कधी आला? मोदींच्या दाव्यानंतर फॅक्ट चेक
नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत 1987-88 च्या सुमारास पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरल्याचा दावा केला, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे

फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
मुंबई : ढगांमुळे वायुसेनेची विमानं रडारमध्ये येणार नाहीत, असा सल्ला दिल्याचं सांगितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. हे वक्तव्य ताजं असतानाच मोदी पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेराने फोटो काढून ईमेलने पाठवल्याचं मोदी म्हणाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत दावा केला. '1987-88 च्या सुमारास मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला. त्यावेळी मोजक्या व्यक्तींकडेच ईमेल आयडी होते. गुजरातमधील विरामगाममध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेत मी त्यांचा फोटो काढला. दिल्लीला तो ट्रान्समिट केला. दुसऱ्या दिवशी आपला रंगीत फोटो छापून आल्याचं पाहून अडवाणी अवाक झाले' असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनी तात्काळ या दाव्यातील तथ्य पडताळून पाहण्यास सुरुवात केली. निकॉनने 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा तयार केल्याकडे काही जणांनी लक्ष वेधलं. तर 1995 च्या आधी ईमेल व्यवस्था सामान्य जनतेसाठी उपलब्धच नव्हती, असंही काही जणांनी सोशल मीडियावर मांडलं. पहिला डिजिटल कॅमेरा कधी आला? 1988 साली फुजी DS-1P हा पहिला डिजिटल कॅमेरा भारतात उपलब्ध करण्यात आला, मात्र त्याची विक्री झाली नव्हती. लॉजिटेक फोटोमनचा डिजिटल कॅमेरा 1990 साली पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची माहिती आहे. त्यामुळे 1988 साली मोदींनी डिजिटल कॅमेरातून पहिला फोटो कसा काढला, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाची आतापर्यंत 9 वेळा क्लीन चिट इंटरनेट कधी सुरु झालं? 1971 साली संगणक अभियंते रे टॉमिल्सन यांनी पहिला ईमेल पाठवला होता. QWERTYUIOP ही अक्षरं वापरुन त्यांनी स्वतःलाच टेस्ट मेल पाठवला होता. 1990 च्या सुमारास अमेरिका ऑनलाईन (एओएल), हॉटमेल, याहू यासारख्या कंपन्यांनी उडी घेतली. 1994 पर्यंत ईमेलला 2 एमबीची मर्यादा असल्यामुळे फोटोही जोडता येत नव्हते. 1991 साली अमेरिकेत इंटरनेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाल्याची माहिती आढळते. त्यानंतर ही सेवा हळूहळू आशिया खंडात विस्तारित झाली. 14 ऑगस्ट 1995 नंतर भारतात सर्वसामान्यांना इंटरनेट उपलब्ध झाल्याचं म्हटलं जातं. 'विदेश संचार निगम लिमिटेड' (वीएसएनएल)ने ही सुविधा सर्वप्रथम सुरु केली. बॉम्बे, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास हे पाच आयआयटी, आयआयएससी बँगलोर यासारख्या मोजक्या संस्थांमधून डायल-अप लिंक्सने जगभरात ईमेल पाठवले जायचे. हा काळ होता 1986 चा. मोदींनी यापैकी एखाद्या संस्थेच्या माध्यमातून फोटो पाठवल्याची शक्यता काही जणांनी बोलून दाखवली आहे. ढग आणि रडार 'पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी शिबिरांवरील हवाई हल्ल्याच्या दिवशी तिथलं हवामान चांगलं नव्हतं. त्यामुळे उपस्थित तज्ज्ञांनी हल्ल्याची वेळ बदलण्याचं सुचवले. पण तिथे ढग असतील आणि पाऊस पडत असेल, तर ते आपल्या लढाऊ विमानांसाठी अधिक उपयुक्त आहे. आपली विमानं ढगांच्या आड राहून पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतील. मला सर्वच विज्ञान माहित नाही, पण हे शक्य आहे, असं मी सांगितले आणि त्यानंतर हल्ला ठरलेल्या दिवशीच झाला', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'हवाई क्षेत्राशी निगडीत रडार हे ढग किंवा पाऊस, कोणत्याही स्थितीत कार्यरत असतात. कारण मुळात हे रडार आकाशातील घनरुप पदार्थ व अन्य लहरींचा शोध घेतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थिअरी न पटण्याजोगी आहे', असं स्पष्ट मत हवाई दलातील माजी वैमानिकांनी मांडलं आहे.
आणखी वाचा























