अमित शाह-शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय झालं?
दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली.
नवी दिल्ली : दिल्लीत सध्या भेटीगाठींचा सिलसिला चांगलाच सुरु आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही भेटींची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी त्यातून निघणारे अर्थ मात्र गडद आहेत.
17 जुलैला दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. 2 ऑगस्टला पुन्हा शरद पवार आणि अमित शाहांची भेट झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत शरद पवार आज अमित शाह यांना भेटले. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कार्यालयात दोघांची भेट झाली. विषय सहकाराचाच होता असं सांगितलं जातंय. याच मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.
भेट सहकाराच्याच मुद्द्यावर..
केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. शरद पवारांसोबत या भेटीवेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, जयप्रकाश दांडेगावकर हे दोन पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे भेट सहकाराच्याच मुद्द्यावर झाली हे उघड आहे.
महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प असावा
महाराष्ट्रातल्या महापुरानंतर एनडीआरएफचा एक बेस कॅम्प महाडमध्ये असावा ही मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केलीय. त्याबद्दलचं निवेदनही या भेटीत त्यांना दिलं गेल्याचं कळतंय.
सहकाराबद्दल का चिंतित आहेत पवार. हा प्रश्न साहजिकच या भेटीगाठीमधून उपस्थित होतो. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत पवारांनी नागरी सहकारी बँकांबद्दल आरबीआयने बदललेल्या नियमांवर काही सुधारणा सुचवल्या होत्या. आजच्या बैठकीमध्ये साखरेचा एमएसपी वाढवण्याबाबत आणि इथेनॉल निर्मिती बाबत प्रोत्साहनासाठी काही सूचना केल्या गेल्या.
दिल्लीत पवार आणि पंतप्रधान मोदी भेटी अनेकदा झाल्या आहेत. पण, पवार आणि अमित शाह ही भेट तशी दुर्मिळच. पवारांची जशी केमिस्ट्री मोदींसोबत आहे. तितकी शाहांसोबत नाहीय. पण केंद्रात सहकार खातं तयार केल्यानंतर ते दिलं गेलंय अमित शाहांकडेच. या माध्यमातून शुगर लॉबीचं राजकारण करणाऱ्यांसाठीही इशारा मानला जातोय. त्या पार्श्वभूमीवर सहकारावरचे पवारांचे प्रश्न अमित शाह कसे हाताळतायत हे पाहावं लागेल.