पश्चिम बंगाल : सरकारी जीआर किंवा नोटिस ही किती काटेकोर असते हे सर्वांनाच माहिती आहे. कारण एखादी टायपिंग मिस्टेकही मोठा घोळ घालू शकते, धोरणांत मोठे बदल घडवू शकते. अशीच एक टायपिंग मिस्टेक पश्चिम बंगालच्या विधानसभेला महागात पडली आहे. त्यामुळे बंगालमधील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सगळ्या आमदारांच्या झोपेचं खोबरं होणार आहे. विधानसभेने राज्यपालांकडे अधिवेशन घेण्यासाठीच्या पाठवलेल्या प्रस्तावामध्ये पीएम ऐवजी एएम झालं आणि राज्यपालांनीही त्यावर सही केली. त्यामुळे बंगालच्या विधानसभेचे अधिवेशन आता मध्यरात्री दोन वाजता होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये फक्त एका टायपिंग मिस्टेकमुळे विधानसभेचे अधिवेशन मध्यरात्री 2.00 वाजता सुरू होणार आहे. त्याचं झालं असं की, पश्चिम बंगालच्या सरकारने राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात अधिवेशनाची वेळ चुकून दुपारी दोन ऐवजी रात्री दोन अशी टाईप झाली. म्हणजेच एम आणि पीएमने (AM and PM) घोळ घातला.
आज राज्यपाल जगदीप धनखड यांनी दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलवले होते. मात्र अधिकारी वेळेत राज्यपालांना भेटण्यासाठी पोहचले नाहीत. त्यानंतर राज्यपालांनी ट्वीट करत कॅबिनेट प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु रात्री 2 वाजता सत्र सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांना आवडला नाही, असे देखील ते म्हणाले.
याविषयावर प्रतिक्रिया देताना विधानसभेचे सभापती बिमान बॅनर्जी म्हणाले, ही एक टायपिंग मिस्टेक होती. राज्यपाल या चुकीला टाळू शकत होते. परंतु तरी देखील त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे सत्र रात्री सुरू होणार आहे. राज्य सरकारने राज्यपालांना अगोदर दोन प्रस्ताव पाठवले होते. ज्यामध्ये अधिवेशनाची वेळ ही दुपारी दोन लिहिली होती. परंतु आता राज्यपालांनी प्रस्तावर सही केल्याने देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
संबंधित बातम्या :