मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष सोहळ्यानं वरळीतील (Mumbai) डोम सभागृह दणाणून गेलं होतं. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठीच्या मुद्द्यावर मुद्देसूद मांडणी करत सरकारला अनेक प्रश्न केले. तर, उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यातील भाषणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तर, ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीमधील नेते राजकीय टीका टिपण्णी देखील करत आहेत. मेरीटच्या विद्यार्थ्याला भीती नसते, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. तर, छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी अधिकची प्रतिक्रिया देणे टाळले. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे, असे त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे खासदार नारायण राणे यांनी या मेळाव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाही, तर ती धोरणात दिसली पाहिजे. पण, तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि मंत्री चंद्रशखेर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यानंतर दिली. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे. यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटलं.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं. नारायण राणेंनी आजच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर बोलण्यास नकार दिला.
मेरीटच्या विद्यार्थ्याला चिंता करायची गरज नाही- मुनगंटीवार
उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते राज्याच्या प्रगतीसाठी काही विषय मांडतील, शोषित पीडित जनतेसाठी काही विषयांची मांडणी करतील ही अपेक्षाच नाही. दोन भाऊ एकत्र आले याचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं हा त्यांचा विषय आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने आम्ही आमचा अभ्यास काही कमी करणार नाही, मेरीटच्या विद्यार्थ्याला याची चिंता करायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, मराठी-मराठेत्तर संघर्ष निर्माण करुन भाजपने सत्ता मिळवली हे म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वेगळ्याच दिशेला विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.
भुजबळ काय म्हणाले
कोणी कुठलेही कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच आहे, राजकीय दृष्टीने ते एकत्र येथील का हे माहिती नाही. राज ठाकरे बाहेर का पडले त्या कारणाचे काय झाले? ते मिटले का अजून माहिती नाही. त्यामुळे, ठाकरे बंधूंचे मनोमिलन होईल का ते पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच, मराठीने त्यांना एकत्र आणले आहे, शिवसेना मराठी विचारातूनच जन्माला आलेली आहे. सध्या, त्रिभाषा सूत्र बाबत अनेक राज्यात अभ्यास सुरू आहे, असेही ते म्हणाले.
कांद्याला 2250 हमीभाव द्यावा - भुजबळ
दरम्यान, कांद्याबाबत आम्ही कळवले आहे, कांद्याला 2250 रुपये हमीभाव मिळावी ही मागणी होत आहे, कांद्याचे दर 5 हजार रुपयांवर गेले तर निर्बंध लावा, वारंवार निर्यात बंद करू नका ही आमची देखील मागणी आहे, अशी माहिती देखील भुजबळांनी दिली.
हेही वाचा
Video: ठाकरे एकत्र, कंठ दाटला, डोळे पाणावले; अनिल परब, बाळा नांदगावकर, पेडणेकरांना बाळासाहेब आठवले