Raj Thackeray Speech Video: मातृभाषा मराठी असताना राज्यात हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न मराठी जणांनी हाणून पाडल्यानंतर आज वरळी डोममध्ये मराठी विजयोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले. या विराट सोहळ्यामध्ये ठाकरे बंधूंचे मनोमिलन सुद्धा अवघ्या राज्यानं पहिलं आणि काही क्षण महाराष्ट्र स्तब्ध झाला. ज्या 20 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण आज महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिला आणि अनेकांनी पाहिला. मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीवरून घणाघाती प्रहार केला. यावेळी त्यांनी मुंबई स्वतंत्र करता येते चाचपडून पाहिलं, भाषेला डिवचून पाहू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढचं पाऊल टाकू असा विचार होता. मात्र, कोणाची माय व्यायली असेल तर महाराष्ट्राला आणि मुंबईला हात लावून दाखवा, असे आव्हानच राज ठाकरे यांनी दिले. 

लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले

गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या कुटुंबांची शाळा सुद्धा काढली जात आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दक्षिणेकडील मुलांची आणि नेत्यांची नावे सांगत कोण कोणत्या शाळेतून शिकले आणि त्यांचा मातृभाषेबद्दल असलेला अभिमान कोणत्या पद्धतीने आहे हेच समजावून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या कुटुंबामध्ये कोण कोठे शिकले यावरून सातत्याने टीका करत ठाकरे कुटुंबावर तोफ लागली होती. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांची शाळा घेत राज ठाकरे यांनी थेट भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणींपासून ते दक्षिणेतील राजकीय नेत्यांची मुलं, अभिनेते कोणत्या ठिकाणी शिकले हे यादीच वाचून दाखवत सांगितलं. राज ठाकरे म्हणाले की लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? असा सवालच राज ठाकरे यांनी केला.  

ते पुढे म्हणाले की तुमचा कडवटपणा कुठे शिकला यावर नसतो तर आतून असावा लागतो. ते पुढे म्हणाले की बाळासाहेब इंग्रजीमधून शिकले, इंग्रजी दैनिकांमध्ये व्यंगचित्र काढत होते. मात्र त्यांनी मराठीसाठी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या मराठीविषयी विषयी तुम्ही शंका घेऊ शकता का? अशी विचारणा त्यांनी केली.  राज यांनी बोलताना देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या रेजिमेंट सुद्धा वाचून दाखवल्या. त्यांनी सांगितले की, त्यांना काही भाषेचा फरक पडत नाही. शत्रू दिसला की तुटून पडतात, तर भाषेचा प्रश्न येतो कुठे? भाषावर प्रांत रचना यासाठीच करण्यात आली होती. दरम्यान भाषेवरून वादळ शांत झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी जणांना इशारा दिला. ते म्हणाले की पुढे जाऊन हे तुम्हाला जातींमध्ये विभागायला सुरू करतील. मराठी म्हणून तुम्हाला हे कधी एक एकत्र येऊ देणार नाहीत. ते म्हणाले की मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा रोवला. मात्र, आम्ही कुठल्या राज्यावर भाषा लादली नाही. कोणासाठी काय करत आहात अशी विचारणा सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या