Weather Updates | देशातील 'या' भागात हवामान खात्याकडून ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा
लडाख भागात मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं त्या भागात तापमानाचा पारा उणे 19 अंशांवर पोहोचला आहे. तर, इथं संपूर्ण देशातही शीतलह चांगलाच जोर धरताना दिसत आहे. हवामान खात्यानं देशातील काही भागात पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
नवी दिल्ली : देशभरात थंडीचा (Cold wave) कडाका वाढत असतानाचा हवामान खात्याकडून देशातील काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हवामान खात्याचा हवाला देत दिल्लीतील दक्षिण भाग आणि हरयाणामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. किंबहुना दिल्लीतील काही भागात पावसाला सुरुवातही झाली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस या भागात जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज आहे. शिवाय गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. परिणामी दिल्लीचा पारा आणखी खाली जाऊन राजधानी गारठणार असंच चित्र सध्या दिसू लागलं आहे.
IN PICS | माता वैष्णोदेवीच्या दरबारावर बर्फाची चादर
भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढत असतानाच शनिवारी बहुतांश भागांमध्ये हलका पाऊस आणि काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी पाहायला मिळाली. तिथं हिमाचल प्रदेशातील किलाँग भागात तापमान उणे 7.3 अंश सेल्शिअसवर पोहोचलं. देशात असणारं हे एकंदर हवामान पाहता त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसून येणार आहे. काहीसं ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा येते दोन दिवस जाणवू शकतो.
Delhi: The national capital wakes up to a rainy morning; visuals from Green Park (pic 1&2) and Chandni Chowk (pic 3&4) areas. pic.twitter.com/O5suBOi83y
— ANI (@ANI) January 3, 2021
हवामाम खात्याकडून 'यलो अलर्ट'
हवामान खात्याकडून देशातील वातावरणाचा आढावा घेत मंगळवारच्या दिवसासाठी हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिमला येथील वेधशाळेनं 3,5 आणि 8 जानेवारीला राज्यातील मैदानी भागांमध्ये मध्यम आणि पर्वतीय भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ज्या पार्श्वभूमीवर 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीमध्ये जनजीवन विस्कळीत
श्रीनगरमध्ये असणाऱ्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळं सर्वच जलस्त्रोत गोठले आहेत. नागरिकांपुढं पिण्याच्या पाण्याअभावी अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. कारगिल आणि लेह परिसरात तापमान उणे 20 अंशांच्याही खाली आलं आहे. शिवाय मागील 24 तासांपासून येथील काही भागात सातत्यानं होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं त्याचे थेट परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहेत.