AAP : पंजाबप्रमाणेच हिमाचलमध्येही क्रांतीची लाट, काँग्रेस आणि भाजपच्या गुलामगिरीतून जनतेला मुक्त करायचय : भगवंत मान
आप ने हिमाचल प्रदेशमध्ये तिरंगा यात्रा काढली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला.
Aam Aadmi Party : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं अभुतपूर्व यश मिळवले आहे. त्यानंतर आप ने आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. अन्य राज्यात आपची ताकद वाढवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रयत्न सुरु केलेत. याच पार्श्वभूमीवर आप ने हिमाचल प्रदेशमध्ये तिरंगा यात्रा काढली. यावेळी भगवंत मान यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला. काँग्रेस आणि भाजपच्या गुलामगिरीतून जनतेला मुक्त करायचे असल्याचे मान म्हणाले.
पंजाबमध्ये आप ने यश मिळवल्यापासून काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्षाचे नेते हिमाचलमध्ये तिसरा पक्ष सत्तेत येऊ शकत नाही, अशी वक्तव्य करत आहेत. याचा अर्थ आम आदमी पार्टीला हे दोन्ही पक्ष घाबरत असल्याचे मान म्हणाले. हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाच्या तिरंगा यात्रेला जनतेचं प्रचंड समर्थन मिळाले. या उदंड जनसमर्थ्याने पंजाबप्रमाणेच इथेही क्रांतीची लाट सुरु झाल्याचे जाणवत असल्याचे भगवंत मान म्हणाले. भाजप आणि काँग्रेसच्या लुटीला कंटाळून येथील जनता आम आदमी पक्षाकडे नवा पर्याय म्हणून पाहत असल्याचे मान म्हणाले.
आम्हाला राजकारण कसे करायचे हे कळत नाही, मात्र देशभक्ती कळते. आधी दिल्लीत बदल केला, पंजाबमध्ये करत आहोत आणि आता हिमाचलमध्येही बदल करु असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. आम्हाला एक संधी द्या असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. तुम्ही इतर पक्षही पाहिले आहेत, एकदा आम्हालाही बघितले की फरक आपोआप दिसेल असे ते म्हणाले.
दरम्यान, आप च्या रॅलीत पक्षाच्या झेंड्याएवजी हातात तिरंगा घेऊन आले होते. याकडे भाजपच्या राष्ट्रवादाला प्रतिउत्तर म्हणून पाहिले जात आहे. पारंपारिक कपडे घालून आलेले लोक खूपच उत्साही दिसत होते. यात जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा जिल्हा असलेल्या मंडी येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजवले आहे. आप पक्ष हिमाचलला तिसरा पर्याय देण्याचा दावा करत आहे. पंजाबच्या निकालानंतर मोठ्या संख्येने लोक आप पक्षात सामील होत आहेत. काँग्रेस भाजपमधील अनेक हताश नेतेही सातत्याने पक्षात सामील होत आहेत.