(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम बंगालमधील पंतप्रधान मोदींच्या सभा आता 500 नागरिकांच्या उपस्थितीतच, भाजपची घोषणा
PM Modi Bengal Rallies: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं भाजपनं पश्चिम बंगालमध्ये यापुढे मोठी सभा करणार नसल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींसह अन्य भाजप नेत्यांच्या सभा जास्तीत जास्त 500 नागरिकांच्या उपस्थितीतच होणार आहेत.
कोलकाता: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं भाजपनं पश्चिम बंगालमध्ये यापुढे मोठी सभा करणार नसल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींसह अन्य भाजप नेत्यांच्या सभा जास्तीत जास्त 500 नागरिकांच्या उपस्थितीतच होणार आहेत. त्या देखील खुल्या मैदानातच होतील. पक्ष आता छोट्या-छोट्या सभा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ भाजपकडूनही प्रचाराबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात निवडणुका होत असून त्यातील पाच टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पू्र्ण झाली आहे.
भाजपनं सांगितलं आहे की, आता इथून पुढं सर्व सभा खुल्या जागेत होतीत. कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी साखळी तोडणं गरजेचं आहे. त्यासाठी भाजपकडून मोठ्या राजकीय कार्यक्रमांचं आयोजन टाळण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी काँग्रेस, लेफ्ट आणि टीएमसीने देखील असाच निर्णय घेतला आहे.
राहुल गांधी यांनीही पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या
कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर इतर नेत्यांनाही मोठ्या जाहीर सभांच्या परिणामांबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "कोविडची परिस्थिती पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व जाहीर सभा रद्द करत आहे. सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जनसभा घेण्याचे काय परिणाम आहेत याचा सखोल विचार करण्याचा मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देईन."
पाच टप्प्यातील मतदान पूर्ण
पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिला टप्प्यात पाच जिल्ह्यात 30 विधानसभा जागांसाठी 27 मार्च रोजी, दुसऱ्या टप्प्यात चार जिल्ह्यातील 30 विधानसभा जागांसाठी एक एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यात 6 एप्रिलला 31 विधानसभांच्या जागांसाठी, चौथ्या टप्प्यात पाच जिल्ह्यातील 44 जागांसाठी 10 एप्रिलला तर 17 एप्रिल रोजी सहा जिल्ह्यातील 45 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं आहे. आता सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यातील 43 जागांसाठी 22 एप्रिलला तर सातव्या टप्प्यात पाच जिल्ह्यातील 36 जागांसाठी 26 एप्रिलला आणि शेवटच्या आठव्या टप्प्यात चार जिल्ह्यात 35 जागांसाठी मतदान होणार आहे. मतगणना दोन मे रोजी होणार आहे.