Vande Bharat Express : वंदे भारतमध्ये प्रवाश्यांना दिलं खराब अन्न, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेची कारवाई
वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या तक्रारीवर IRCTC ने प्रतिक्रिया दिली आहे.प्रवाशाने ट्रेनमध्ये खराब जेवण मिळत असल्याची तक्रार केली होती.
मुंबई : देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा लोक रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता असल्याच्या तक्रारी करतात. अशीच एक तक्रार वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने केली आहे. आकाश केशर नावाच्या प्रवाशाने सोशल मीडिया ट्वीटरच्या माध्यमातून ही तक्रार केली. वंदे भारत ट्रेन क्रमांक 22416 मध्ये प्रवाश्यांना खराब जेवण देण्यात आले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली.
या ट्विटमध्ये या प्रवाश्याने म्हटलं की, "मी नवी दिल्ली ते वाराणसी असा वंदे भारत रेल्वेमधून प्रवास करत होतो. पण या रेल्वेमध्ये आम्हाला देण्यात आलेल्या जेवणातून दुर्गंधी येत होती आणि जेवणाचा दर्जा खूपच खराब आहे. त्यामुळे कृपया करुन माझे सर्व पैसे परत करावेत. हे वंदे भारत एक्सप्रेसच्या ब्रँडला कलंक लावत आहेत. यावेळी या प्रवाश्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक लोकांनी अन्न जमिनीवर ठेवले आहे आणि ते कर्मचाऱ्यांना ते अन्न काढून घेण्यास सांगत आहेत. व्हिडिओमध्ये भाजीला दुर्गंधी येत असल्याचे लोक सांगत आहेत.
@indianrailway__ @AshwiniVaishnaw @VandeBharatExp Hi sir I am in journey with 22416 from NDLS to BSB. Food that was served now is smelling and very dirty food quality. Kindly refund my all the money.. These vendor are spoiling the brand name of Vande Bharat express . pic.twitter.com/QFPWYIkk2k
— Akash Keshari (@akash24188) January 6, 2024
रेल्वेकडून कारवाई
यानंतर आयआरसीटीसीने त्या पोस्टची दखल घेत उत्तर दिले. त्यांनी म्हटलं की, यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. ही बाब गांभीर्याने घेतली जाईल. तसेच सर्विस प्रोव्हायडरला योग्य तो दंड ठोठावला जाईल. याशिवाय, जबाबदार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे आणि परवानाधारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. ऑन-बोर्ड सेवांचे निरीक्षण अधिक कठोरपणे केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं
वंदे भारत ट्रेन क्रमांक 22416 वंदे भारत एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते वारणसी दरम्यान चालवली जाते. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही वारणसी ते नवी दिल्ली अशीच 2019 मध्ये चालवण्यात आली होती.