Uttarakhand : तीन दिवसांच्या पावसामुळे उत्तराखंडांत कहर; आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू
Uttarakhand : पावसामुळे राज्यात आतापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
Uttarakhand : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडात कहर माजला आहे. या पावसामुळे उत्तराखंडाचं जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. पावसामुळे राज्यात आतापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
सोमवारी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला. आज 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे राज्यातील संकटावर लक्ष ठेऊन आहेत. उत्तराखंडमध्ये लष्कराची मदत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आता लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक प्रदेशांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी लोक फसले आहेत. प्रशासनाच्या वतीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलं असून या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं कार्य सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
केरळमध्येही महापूर
केरळमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तसेच पटनमथीटाच्या खालच्या भागांत आज पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kerala Floods Viral Video : केरळात पुराचा हाहाःकार; जोडपं स्वयंपाकाच्या भांड्यातून लग्नस्थळी, व्हिडीओ व्हायरल
- Kerala Floods : केरळात पावसाचा रुद्रावतार; अनेक भागांत भूस्खलन, मृतांची संख्या 31 वर
- Kerala Heavy Rain: केरळमध्ये आस्मानी संकटात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा