उत्तर प्रदेश : एखाद्या नव्या कामाच्या सुरुवातील नारळ फोडून शुभ शकून करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. अशाच एका उद्घाटनाची सध्या चर्चा सुरु आहे. त्याचं कारणही तितकंच विचित्र आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार उघड झाला आहे आणि हे पितळं उघडं पडण्याची घटना ज्याप्रकारे घडली त्याचीही जोरदार चर्चा होत आहे. बिजनौरमध्ये भाजपा आमदार सूची चौधरी रस्त्याचं उद्घाटन करत असताना नारळ वाढवण्याच्या वेळी नारळ फुटलाच नाही, त्याऐवजी रस्त्यात मात्र खड्डा पडला. या घटनेमुळे उद्घाटनप्रसंगीच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. यावर काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे.


सिंचन विभागाकडून बिजनौरमधील कालव्याजवळ रस्ता तयार करण्यात आला. 7 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 1 कोटी 16 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र केवळ 700 मीटर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावरच या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. एकूण 7 किलोमीटरचा रस्ता तयार करुन त्याला कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे.


रस्त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची चौधरी या आपल्या पतीसह पोहोचल्या. विधीवत पूजा पार पडल्यानंतर आमदारांनी नारळ वाढवण्यास सुरुवात केली. सूची चौधरी यांनी नारळ फोडण्यासाठी रस्त्यावर आपटला. मात्र, नारळ फुटलाच नाही. त्या ऐवजी रस्त्यावर खड्डा पडला. त्यामुळे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. यावेळी नाराज आमदार आणि नागरिकांनी घटनेवर संताप व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणी चौकशीची मागणी केली. 


याप्रकरणावर उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे. काँग्रेसनं ट्विट केलं आहे की, ''एक रस्ता साध्या नारळाचा फटका सहन नाही करु शकला. यालाच म्हणतात विकास!'' ​






जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत समिती स्थापन केली आहे. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामात कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, असं आश्वासनही जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी दिलं आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha