NCP MP Dr. Amol Kolhe tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून त्यांनी ट्वीट केले आहे. ही पेन्टिंग्ज पेशवेकालीन आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही असेही डॉ. कोल्हे यांनी म्हटले. त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर फोटो, सेल्फी घेतला. त्यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी हे ट्वीट योग्य असल्याचे म्हटले. तर, काही युजर्सने तुम्ही खासदार असून त्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. डॉ. कोल्हे यांच्या ट्वीटला काहींनी विरोधदेखील केला आहे. एका युजरने पेशव्यांबद्दल आदर असेल तर पुणे विमानतळाचे नामकरण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे करावे अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 'जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता, तर मग मृत्यूंची जबाबदारीही घ्या', खा. अमोल कोल्हेंची पंतप्रधान मोदींवर आक्रमक टीका
- Devendra Fadnavis : भगव्याची शपथ घेतलेल्यांना त्याची लाज वाटतेय, फडणवीसांचा टीकेचा बाण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha