Cyclone Jawad:  'जोवाड' (Cyclone Jovad) चक्रीवादळाची बंगालच्या उपसागरात निर्मिती झाली आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात पोहोचताना वादळाभोवती फिरणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी 100 किलोमिटरपर्यंत असणार आहे, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या असून एनडीआरएफच्या 64 टीम ओदिशामध्ये तयार असल्याची माहिती मिळाली आहे. 


पंतप्रधानांनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोवाडच्या संकटाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितलं की, चक्रीवादळ शनिवारी आंध्र प्रदेशच्या उत्तरी भागात आणि ओदिशा किनारपट्टीवर  पश्चिमी-मध्य बंगालच्या खाडीत पोहोचण्याची शक्यता आहे.  


किनारपट्टीजवळ येताना 'जोवाड' चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याचा शक्यता आहे. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर तीव्रता कमी होणार  आहे. किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, उडीशा आणि पश्चिम बंगालला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे. पाच डिसेंबरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व ऑपरेशन्स रद्द करण्यात आली आहेत.  
 
सर्वाधिक फटका आंध्रतील श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, उडीशातील गजापती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रपारा जिल्ह्यांना बसण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, उडीशा, पश्चिम बंगालसोबतच आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात देखील पाऊस अपेक्षित आहे.  


महाराष्ट्राला जोवाड चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही 


एनडीआरएफकडून बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी परिपूर्ण असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत तर 33 चमूंना गरजेनुसार तयार आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.  लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहे. पूर्व किनारपट्टीवर आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार सज्ज करण्यात आली आहे. 


'जोवाड' नाव कसं ठेवलं? 


सौदी अरेबियाच्या सूचनेवरून या वादळाला 'जवाद' असं नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'उदार' असा होतो. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळांच्या तुलनेत या चक्रीवादळामुळे फारसा विध्वंस होणार नाही आणि सामान्य जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान,  IMD म्हणजेच, भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे की 4 डिसेंबरच्या सकाळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी असेल.