Amit Shah : दिल्ली पोलिसांनी अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या, गृहमंत्री अमित शाह यांनी केलं कौतुक
कोरोना काळात दिल्ली पोलिसांनी विलक्षण काम केले आहे. एवढेच नाही तर दिल्ली पोलिसांनी राज्यातील अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
Amit Shah on Delhi Police: कोरोना महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांनी विलक्षण काम केले आहे. एवढेच नाही तर दिल्ली पोलिसांनी राज्यातील अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस लाईन्स येथे दिल्ली पोलिसांच्या 75 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थानाही होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त एक विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांचे जोरदार कौतुक केले.
दिल्ली पोलिसांनी अनेक दहशतवादी घटना उधळून लावल्या
आजच्या दिल्लीतील कार्यक्रमात अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांनी असामान्य काम केले आहे. जे काम देशभरातील पोलीस कर्मचार्यांसाठी प्रेरणादायी आहे. परंतू या काळात त्यांनी अनेक दहशतवादी घटनाही उधळून लावल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी पुढील 5 वर्षांसाठी तसेच पुढील 25 वर्षांसाठी एक रोडमॅप तयार केला पाहिजे असे देकील शाह म्हणाले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे मी मनापासून अभिनंदन करत असल्याचे शाह म्हणाले.
दिल्ली पोलिसांचा 75 वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. आजपासून दिल्ली पोलिसांचा लोगो देखील बदलला आहे. स्थापना दिनानिमित्त दिल्ली पोलिसांनी नवा लोगो जारी केला आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी एक आदेश जारी करताना सांगितले की, सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी आता त्यांच्या गणवेशाच्या उजव्या बाजूला नेम प्लेटवर नवीन प्रकारचे चिन्ह लावतील. पोलीस विभागाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन लोगो तयार केला आहे. 1948 मध्ये दिल्ली पोलिसांचे डीडब्ल्यू मेहरा यांना दिल्ली पोलिसांचे पहिले प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. म्हणूनच दरवर्षी 16 फेब्रुवारीला दिल्ली पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. आजपासून 75 व्या स्थापना दिनानिमित्त दिल्ली पोलिसांच्या गणवेशावर नवा लोगो दिसणार आहे.