केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल; बारावीच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरियाल यांना कोरोना होऊन गेला असून त्यानंतर उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तातडीनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच रमेश पोखरियाल यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरियाल यांना कोरोना होऊन केला आहे. तसेच कोरोना नंतरच्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 21 एप्रिल रोजी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसेच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज सामान्य स्वरुपात सुरु राहील असंही त्यांनी सांगितलं होतं.
आज होणार होती 12वीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा
बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषयी माहिती देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. तसेच 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल. परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करत परीक्षा घेतल्या जाणार आहे.
दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु बारावी बोर्डाची परीक्षा केवळ स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देखील रद्द करावी आणि याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टात बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर मागील आठवड्यात शुक्रवारी (28 मे) सुनावणी होणार होती, परंतु ती टळली. आज या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी झाली, जी पुन्हा एकदा टळली आहे. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे.
सीबीएसईची बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत सरकारला 1 जूनपर्यंत निर्णय घ्यायचा होता. पण आता अंतिम निर्णय घेण्यात उशीर होणार आहे. परीक्षेबाबत आतापर्यंत दोन वेळा बैठक झाली आहे.मागच्या बैठकीत CBSE ने 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान बारावी बोर्डाच्या परीक्षेचं आयोजन करण्याचं आणि सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परीक्षेची तारीख घोषित करण्यामध्ये किमान 15 दिवसांचा कालावधी विद्यार्थ्यांना दिला जाईल अशीही चर्चा होती. तसंच केवळ मुख्य विषयांचीच परीक्षा घेतली जावी किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार परीक्षा घेऊन वेळमर्यादा कमी करावी, असाही प्रस्ताव होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :