Udaipur Murder Case : कन्हैया लालच्या हत्येत वापरली 2611 क्रमांकाची दुचाकी, खास नंबरसाठी मारेकऱ्याने मोजले होते पैसे
Udaipur Murder Case : उदयपूर येथील कन्हैया लाल याची हत्या करून पळून जाण्यासाठी आरोपींनी जी दुचाकी वापरली आहे तिचा नंबर 2611 असा असून या नंबरसाठी आरोपींनी आरटीओकडे पाच हजार रूपये भरल्याची माहिती समोर आली आहे.
Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैया लाल याच्या हत्येप्रकरणी आता रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या पथकाला आणखी एक धक्कादयक माहिती मिळाली आहे. कन्हैया लाल याची हत्या करून पळून जाण्यासाठी आरोपींनी जी दुचाकी वापरली आहे तिचा नंबर 2611 असा असून या नंबरसाठी आरोपींनी आरटीओकडे पाच हजार रूपये भरल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याचा राग मनात धरून राजस्थानमधील उदयपूर येथे दोघांनी एका टेलरची हत्या केली आहे. या हत्येत आता रोज नव-नवीन माहिती पुढे येत आहे. कन्हैया याची हत्या करण्यासाठी मारेकरी एका दुचाकीवरून आले होते आणि हत्या करून ते त्याच दुचाकीवरून परत गेले. या दुचाकीचा नंबर आरजे 27 एएस 2611 असा आहे. या नंबरसाठी आरोपी मोहम्मद गौस आणि रियाझ अत्तारी यांनी आरटीओकडे पाच हजार रूपये भरले होते. 2611 म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. याच दिवसामुळे दोन्ही आरोपींनी 2611 असा नंबर आपल्या गाडीसाठी घेतला होता. आता तपास यंत्रणा या दुचाकी क्रमांकाबाबत तपास करत आहेत.
आरोपी पाकिस्तानच्या संपर्कात
कन्हैया लाल याच्या हत्येतील आरोपी मोहम्मद गौस आणि रियाझ हे पाकिस्तानमधील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गौस हा 2014 साली 30 जणांची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर घेऊन गेला होता. या टीमने दावत-ए-इस्लामीच्या मिरवणुकीत भाग घेतला होता. यादरम्यान गौस आणि इतरांनी 40 दिवस पाकिस्तानातील अनेक इस्लामिक आणि धार्मिक संघटनांच्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. गौस यानेच रियाझ अत्तारी याला प्रशिक्षण दिले होते. तीस जणांच्या या टीममध्ये उदयपूरच्या तीन जणांचा समावेश होता.
रियाझ आणि गौस हे दोघेही पाकिस्तानातील व्यक्तीसोबत बोलत असत. त्यांचे आणि पाकिस्तानमधील व्यक्तीमधील शेवटचे बोलणे देखील समोर आले आहे. यामध्ये पाकिस्तानातील व्यक्ती या दोघांना तुम्ही काहीच करत नाही म्हणून धमकावत आहे. यावेळी रियाझ याने लवकरच काही तर करून दाखवू असा शब्द दिला. त्यानंतर पाकिस्तानातील म्होरक्याचा विश्वास जिंकण्यासाठी रियाझ आणि गौस यांनी कन्हैयाच्या हत्येचा व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला.
दहशत पसरवण्याच्या सूचना मारेकऱ्यांना पाकिस्तानमधून मिळत होत्या. कन्हैया लाल याच्या हत्येनंतर हे दोन्ही मारेकरी उदयपूरमधील आणखी एका व्यावसायिकाची हत्या करणार होते. कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही पुरावे मिळाले आहेत.