आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव, राहुल गांधींचा आरोप, ट्विटरचं स्पष्टीकरण
Twitter Reply to Rahul Gandhi : आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव, राहुल गांधींचा आरोप. ट्विटर प्रवक्त्यांकडून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं खंडन
Twitter Reply to Rahul Gandhi : ट्विटरला भारताच्या विचारांच्या विनाशाचा मोहरा बनवू देऊ नका, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटर इंडियाचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं होतं. आपला आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी या पत्रात केला होता. तसेच वैध कारण न देता ट्विटर अकाऊंट ब्लाॉक केलं गेल्याचंही राहुल गांधींनी या पत्रात म्हटलं होतं. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर ट्विटर इंडियाकडून उत्तर देण्यात आलं आहे.
ट्विटर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. फॉलोअर्सची संख्या अर्थपूर्ण आणि अचूक असल्याचं ट्विटरनं सांगितलं आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यानं फॉलोअर्सची संख्या हे समोर दिसणारं एक फिचर असून प्लॅटफॉर्मची हाताळणी आणि गडबड यासाठी चुकीला कोणतीही जागा नसल्याचं ट्विटरनं म्हटलं आहे.
फॉलोअर्स कमी करण्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर, ट्विटर पुढं म्हणाले, "आम्ही कोणत्याही प्रकारचा घोटाळा तसंच छेडछाड होऊ नये यासाठी धोरणात्मकपणे आणि मशीन लर्निंग टूल्सच्या सहाय्याने लढा देतो. चांगली सेवा आणि विश्वासार्ह खाती सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात."
दरम्यान, राहुल गांधी यांनी 27 डिसेंबर रोजी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं होतं. ट्विटर मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी ट्विटरला काही तपशीलवार माहिती पाठवली होती. त्यातून त्यांनी निदर्शनास आणून दिले की, पूर्वी दरमहा सरासरी 2.3 लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांमध्ये तो आकडा वाढून 6.5 लाखांपर्यंत गेला होता. परंतु, ऑगस्ट 2021 पासून, म्हणजेच अकाउंट अनलॉक झाल्यापासून त्यांचे महिन्याला केवळ 2500 फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले 1 कोटी 95 लाख फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2021 मध्ये राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचं छायाचित्र ट्वीट केलं होतं. त्यानंतर त्यांचे ट्विटर अकाऊंट वादात सापडलं होतं. पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्वीट करून त्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला होता. नंतर, कायद्याचं उल्लंघन झाल्याचं म्हणत राहुल गांधींचं अकाउंट एका आठवड्यासाठी ट्विटरकडून लॉक करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Air India Tata : एअर इंडियामध्ये आजपासून 'टाटा' राज; या सेवेद्वारे प्रवाशांच्या सेवेत
- UP Election 2022 : भाजपचे लक्ष आता जाट 'व्होट बँके'कडे, अमित शाह यांची जाट नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा