TRP SCAM | कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच अर्णब गोस्वामींचा उल्लेख
आरोपी पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) आणि अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच त्यांच्या रिमांड कॉपीमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या नावाचा उल्लेख केलाय.
मुंबई: कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख केलाय. या प्रकरणी अटक करण्यात आलेले BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या पोलीस कोठडीत 30 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं निर्देश दिलेत.
कथित टीआरपीप्रकरणी 25 डिसेंबर रोजी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
काही आठवड्यांपूर्वी BARC चे माजी COO रोमिल रामगढिया यांना अटक करण्यात आली होती. BARC ही टीआरपी अधिकृतरित्या मॉनिटर करणारी संस्था आहे. या संस्थेनं लोकांच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावण्याची जबाबदारी हंसा रिसर्च एजन्सीला दिली होती.
या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितलं की पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी जुने मित्र आहेत. पार्थो दासगुप्ता यांनी अर्णबला मदत केली आहे. ते अर्णबच्या सांगण्यावर टीआरपी मॅनेज करायचे.
पोलिसांना पार्थो दासगुप्ता यांच्याकडून Tag- Heuer कंपनीचे घड्याळ ( किंमत 1 लाख रुपये), कानातील चांदीच्या 62 रिंग, 59 बांगड्या, चंदेरी रंगाचे 12 नेकलेस, 6 अंगठ्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये नोंद करण्यात आल्याप्रमाणे आरोपी पार्थो दासगुप्ताने रिपब्लिक इंग्लिश आणि हिंदी या वाहिनीच्या टीआरपीमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य संबंधित आरोपींशी संगनमत करुन बेकायदेशीर मार्गाने फेरफार केली आणि त्यांचा टीआरपी वाढवला. त्या बदल्यात अर्णब गोस्वामी यानी आरोपी पार्थो दासगुप्ता यास वेळोवेळी लाखो रुपये दिल्याचं निष्पन्न झालं आहे.
बार्क BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला याआधीच अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईडीने सुद्धा या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.
संबंधित बातम्या: