धबधब्यावर पार्टी केली आणि परतण्याची वाट चुकले! जंगलात ट्रेकिंगला गेलेले 9 विद्यार्थी भरकटले, तब्बल 24 तासानंतर सुटका
Students lost in Jungle : एका झाडाखाली दुचाकी थांबवली आणि नंतर ते जंगलात गेले. जंगलाच्या पायवाटेने जावून धबधब्यावर पार्टी देखील विद्यार्थ्यांनी केली. पार्टी करून परत येताना विद्यार्थ्यांचा रस्ता चुकला.
बेळगाव : कणकुंबी जंगलात ट्रेकिंगला गेलेलेबेळगावचे नऊ विद्यार्थी रस्ता चुकल्याने भरकटले. या विद्यार्थ्यांना संपूर्ण रात्र भीतीच्या छायेखाली जंगलात काढावी लागली. अखेर 24 तासानंतर वनखात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली.
गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवाड गावच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावनी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेत असलेले नऊ विद्यार्थी शुक्रवारी दुपारी चार दुचाकींवरून गेले होते. पारवाड गावापासून तीन किमी अंतरावर त्यानी आपली दुचाकी फूटपाथच्या बाजूने घेतली होती, एका झाडाखाली दुचाकी थांबवली आणि नंतर ते जंगलात गेले. जंगलाच्या पायवाटेने जावून धबधब्यावर पार्टी देखील विद्यार्थ्यांनी केली. पार्टी करून परत येताना विद्यार्थ्यांचा रस्ता चुकला. दुचाकी पार्क केलेल्या जागेकडे ते पोचू शकले नाहीत.
घनदाट जंगलात रस्ता चुकल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांचे धाबे दणाणले. तरी प्रसंगावधान राखून आपल्या मदतीला येण्याचा संदेश ट्रेकर्सनी शुक्रवारी रात्री आपल्या कॉलेजच्या मित्रांना पाठवला. ट्रेकर्सच्या मित्रांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ए सी एफ. संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री दहा वाजता पारवाड जंगलातून शोध मोहिमेला सुरुवात केली. शिवाय विद्यार्थी जंगलात बेपत्ता झाल्याची बाब गोव्याच्या वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे गोव्याच्या वन खात्याने देखील गोव्याच्या जंगलातून शोध मोहीम सुरू केली.
शनिवारी पहाटे हे विद्यार्थी गोव्याच्या जंगलात खडकांमध्ये दमून बसलेले आढळले. तेथून त्यांना कणकुंबी विभागीय वन अधिकारी कार्यालयात आणण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर गोवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रेकिंगला जाताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष केल्याने जंगलात हरवणे किंवा अपघात होणे असे प्रकार घडतात.