Tree Planting : शहरी भागात वृक्ष लागवडीला सरकारचं प्रोत्साहन, नगर वन योजनेद्वारे 2020 पासून आत्तापर्यंत 385 प्रकल्पांना मंजुरी
शहरी भागांसह सर्वत्र वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांद्वारे उपक्रम हाती घेत आहे.
Tree Planting : वृक्ष लागवड (Tree Planting) करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे काम सुरु आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने, देशातील शहरी भागांसह सर्वत्र वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांद्वारे उपक्रम हाती घेतले आहेत. 2020 साली नगर वन योजना (NVY) हा उपक्रम शहरी भागात नागरी वनांच्या निर्मितीसाठी सुरु करण्यात आला आहे. ही योजना स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना समावून घेत शहरी वनीकरणाला प्रोत्साहन देते.
जंगलाबाहेरील वृक्ष (ToF) ही संज्ञा नोंदणी केलेल्या वनक्षेत्राबाहेर वाढणाऱ्या सर्व झाडांसाठी वापरली जाते. नोंदणी केलेल्या वनक्षेत्राच्या बाहेर 1 हेक्टर आणि त्याहून अधिकचे हरित पट्टे आणि वृक्षाच्छादित क्षेत्र हे दोन्ही जंगलाबाहेरील वृक्ष (ToF) मानले जातात. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या भारतीय वन सर्वेक्षण (FSI) विभागाद्वारे प्रकाशित भारत राज्य वन अहवाल (ISFR), 2015 नुसार देशाचे वृक्षाच्छादन सुमारे 92,572 चौरस किमी आहे. भारत राज्य वन अहवाल (ISFR), 2021 नुसार देशाचे वृक्षाच्छादन सुमारे 95,748 चौ. किमी आहे. भारत राज्य वन अहवाल, 2021 अंतर्गत भारतीय वन सर्वेक्षण विभागाने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या प्रमुख शहरांमधील वनाच्छादनाचे मानचित्रण केले आहे. या सात प्रमुख शहरांमध्ये एकूण वनक्षेत्र 509.72 चौ.कि.मी. आहे.
नगर वन योजनेत रहिवाशांना निरोगी राहणीमानाचे वातावरण उपलब्ध करुन देतील अशा स्वच्छ, हरित, निरोगी आणि शाश्वत शहरांच्या वाढीस हातभार लावण्यासाठी महानगरपालिका, महनगरपरिषद , नगरपालिका, नगरपरिषद आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) असलेल्या प्रत्येक शहरात नगर वन निर्माण करण्याची संकल्पना आहे. साल 2020 मध्ये नगर वन योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात 385 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 20 हजार वृक्षांची लागवड केली जाणार
महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या (Public Works Department) वतीनं 20 हजार वृक्षांची लागवड (Tree Planting) केली जाणार आहे. याचा शुभारंभ मोरगाव इथं 22 जुलैला करण्यात आला. 'पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत ही लागवड केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यामध्ये त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि शासकीय इमारत परिसरात किमान 10 फूट उंचीचे 20 हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे या वृक्षारोपणाचा मुख्य हेतू आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Tree Planting : 20 हजार वृक्ष लागवडीचा आज शुभारंभ, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांचा संकल्प