Fact Check : एका फोन मध्ये दोन सीम वापरणाऱ्यांना दंड भरावा लागेल का? ट्रायनं खरं काय ते सांगितलं...
TRAI News : एका फोन मध्ये दोन सीम कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना दंड किंवा फी भरावी लागेल, असं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. यावर ट्रायनं स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली : एका स्मार्टफोनमध्ये दोन सीम कार्ड (Multiple Sim Card Users) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही माध्यमांमधून एका फोन मध्ये दोन सीम कार्ड वापरणाऱ्यांना दंड आकारला जाणार असल्याचं वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं. ट्राय (TRAI)या संस्थेकडून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र, ट्रायनं या सर्व गोष्टींबाबत स्पष्टीकरण देत अशा प्रकारचा कोणताही दंड किंवा फी दोन सीम कार्ड वापरणाऱ्यांकडून आकारली जाणार नाही, असं म्हटलं आहे.
ट्रायकडून स्पष्टीकरण
टेलिकॉम रेग्यूलटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायकडून 6 जूनला नॅशनल नंबरिंग प्लॅनचा आढावा जाहीर करण्यात आला होता. त्या योजनेबाबत संबंधित घटकांकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. हा अभिप्राय नोंदवण्याची मुदत 4 जुलै 2024 पर्यंत होती.तर, प्रत्यक्ष अभिप्राय नोंदवण्यासाठी 18 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, काही माध्यमांमध्ये ट्राय कडून मोबाईल आणि लँडलाईन क्रमांकावर फी आकरणं प्रस्तावित असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. जे वापरकर्ते अनेक सीम कार्ड वापरतात त्यांच्याकडून दंड आकारला जाणार असल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. मात्र, ट्रायनं या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाल्याचं ट्रायनं म्हटलं आहे.
ट्रायचं ट्विट
The speculation that TRAI intends to impose charges on customers for holding multiple SIMs/ numbering resources is unequivocally false. Such claims are unfounded and serve only to mislead the public.
— TRAI (@TRAI) June 14, 2024
ट्रायनं पुढं दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं की, दूरसंचार विभागानं ट्रायला 29 सप्टेंबर 2022 ला नॅशनल नंबरिंग प्लॅनची पुनर्रचना करण्यासांदर्भात सूचना केली होती. त्यानुसार नॅशनल नंबरिंग प्लॅन संदर्भातील कन्स्लटेशन पेपर जारी करण्यात आला आहे.
ट्रायनं दूरसंचार क्षेत्रातील सर्व घटक, मोबाईलचे वापरकर्ते यांना ट्रायनं जारी केलेल्या कन्स्लटेशन पेपरचा संदर्भ घेण्याचं आवाहन केलं आहे. संबंधित पत्रक ट्रायच्या वेबसाईटवर उलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी एका फोन मध्ये दोन सीम कार्ड वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानं अनेक जण दोन सीम कार्डचा वापर करतात. ट्रायनं दोन सीम कार्ड वापरणाऱ्यांवर कसलाही दंड आकारला जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं एकाच फोन मध्ये दोन सीम कार्ड वापरणाऱ्यांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.
या देशांमध्ये सीम कार्डसाठी टेलिकॉम कंपन्या शुल्क आकारतात
ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलँड, यूके, लिथुआनिया, ग्रीस, हांगकांग, बुल्गारिया, कुवैत, नेदरलँड, स्वित्झरलँड, पोलंड, नायजेरिया, दक्षिण अफ्रीका आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये टेलिकॉम कंपन्या शुल्क आकारतात.
इतर बातम्या:
Father's Day 2024 : 'फादर्स डे'ला इलेक्ट्रिक स्कूटर्स भेट द्यायची? हे आहेत पाच पर्याय
60 हजारात इलेक्ट्रिक स्कूटर्स, झेलियो ईबाईक्सने ग्रेसी सीरीजची स्कूटर्स लॉन्च