ममता सरकार वि. सीबीआय : सीबीआयच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
कोलकाता पोलीस आयुक्तांविरोधात पुरावे सादर करा, आम्ही कठोर कारवाई करण्यास तयार आहोत, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने काल कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरी छापेमारी केली होती. पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक करत कारवाईला विरोध केला. याप्रकरणी सीबीआयने आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाने आधी आयुक्तांविरोधात पुरावे सादर करावे, त्यानंतर उद्या सुनावणी घेऊ असे आदेश सीबीआयला दिले आहे.
शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार पुरावे नष्ट करत असल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. यावर बोलताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं की, आजच सुनावणी घेणं गरजेचं नाही. कोलकाता पोलीस आयुक्तांविरोधात पुरावे सादर करा, आम्ही कठोर कारवाई करण्यास तयार आहोत.
शारदा चिटफंट घोटाळा प्रकरणी पुराव्यांशी छेडछाड होत असल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. त्याविषयी सरन्यायाधीश म्हणाले की, पुरावे इलेक्ट्रॉनिक आहेत. पुरावे नष्ट केले तर ती पुन्हा शोधले जाऊ शकतात. तुम्ही हे पुरावे नष्ट केले जात आहेत, याबाबत पुरावे सादर करा. तसेच याविरोधात कठोर कारवाईही केली जाईल.
काय आहे प्रकरण?
रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कारवाईपासून फक्त रोखलंच नाही, तर त्यांना बेड्या ठोकून पोलिस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर सीबीआयच्या सर्व अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं असलं तरी दोन तपास यंत्रणा यानिमित्ताने आमनेसामने आल्या. या सर्व प्रकारामुळे कोलकात्यात सध्या एकप्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरुन सीबीआयने ही कारवाई केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी आपल्याला त्रास देत असून अजित दोभाल यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरु असल्याचंही ममतांनी म्हटलं आहे. वॉरंटविना पोलिस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची सीबीआयची हिंमतच कशी झाली? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
