(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Silver rates | सोनं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; जाणून घ्या आजचे दर
काही वर्षांच्या तुलनेत (Gold Silver) सोनं- चांदीच्या दरांत मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतानाच हे दर आता अवघ्या काही रुपयांनी घसरले तरीही अनेकांच्याच नजरा वळतात.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक प्रलंबित कार्यक्रम आणि समारंभांना सुरुवात झाली. काही महत्त्वाच्या निर्बंधाचं पालन करत लग्नसोहळेही आणि कौटुंबीक कार्यक्रमही पार पडू लागले. ओघाओघानं खरेदी आणि विशेषत: दागिन्यांच्या खरेदीकडे पुन्हा एकदा अनेकांचाच कल दिसून आला.
काही वर्षांच्या तुलनेत (Gold Silver) सोनं- चांदीच्या दरांत मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतानाच हे दर आता अवघ्या काही रुपयांनी घसरले तरीही अनेकांच्याच नजरा वळतात. सध्याच्या घडीलाही या दरांमध्ये अशीच घसरण पाहायला मिळत आहे. दर, चांदीची स्थितीही अशीच आहे.
सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर, 300 रुपयांनी घसरला. तर, चांदीचे दर 266 रुपयांनी घसरले. गुरुवारीही हे दर 300रुपयांनी तर, शुक्रवारी तब्बल 2 हजार रुपयांनी उतरले होते.
कोरोना लसीच्या घोषणेनंतर सोन्या चांदीच्या दरांमध्ये बदल झाले होते. त्यानंतर अमेरिकेतील कॅपिटल हिंसाचाराचेही परिणाम या दरांवर दिसून आले. एमसीएक्सवर सोने 2086 रुपयांनी घसरलं, ज्यामुळं प्रतिग्रामसाठी हे दर 48818 रुपये असल्याचं निदर्शनास आलं. तर, प्रतिकिलो चांदीच्या दरातही कपात झाली. 6122 रुपयांची कपात झाल्यामुळं हे दर, 63850 रुपयांवर पोहोचले.
good returns संकेतस्थळानुसार सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 48480 रुपये इतके, तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49482 रुपयांवर स्थिरावले. दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी 48470 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 52870 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर सातत्यानं घसरत आहेत. 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरानं 56 हजारांचा आकडा ओलांडला होता. ज्यानंतर आताचे दर पाहता जवळपास 13 टक्क्यांनी हे दर खाली उतरल्याचं म्हटलं जात आहे.