"कित, कित, कित कित..." तृणमूलच्या खासदारानं हात वर करून हे काय केलं? संसदेत सगळेच लागले हसायला; व्हिडीओ तुफान व्हायरल
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या संसदेतील भाषणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या वेगवेगळ्या विषयांवर तुफानी चर्चा होत आहे. संख्याबळ वाढल्यामुळे सभागृहात विरोधकांचा कधी-कधी वरचष्मा दिसत आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान याच अधिवेशनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांच्या खास भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पण्या करत सत्ताधारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर खरपूस टीका केली आहे.
अखिलेश यादव यांचा शायराना अंदाज
मंगळवारी संसदेत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. शायरीच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनीदेखील सरकारला घेरलं. त्यांनी आपल्या खास भाषणशैलीने संसदेच्या सदस्यांचं लक्ष वेधलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाकडून 'अबकी बार 400 पार' असा नारा दिला होता. या घोषणेच्या माध्यमातून आम्हालाच बहुमत मिळेल, असा दावा भाजपने केला होता. याच घोषणेचा आधार घेत बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
Absolute comedy gold in Lok Sabha from Kalyan Banerjee 😂
— Roshan Rai (@RoshanKrRaii) July 2, 2024
Don't miss Mahua Moitra's reaction and Om Birla's face 😹
Can't stop laughing.
pic.twitter.com/nyjv04jzVz
कल्याण बॅनर्जी नेमकं काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्ष मात्र भाजपाला फक्त 230 जागा जिंकता आल्या. एनडीए आघाडीतील इतर घटकपक्षांची मदत घेऊन भाजपाने आता सरकारची स्थापना केली आहे. याच मुद्द्यावर बोलताना बॅनर्जी यांनी भाजपावर बोचरी टीका केली. तुम्ही अबकी बार 400 पार अशी घोषणा केली. पण काय झालं? खेळ सुरू झाला, असं ते म्हणाले. तसेच वर केलेले हात खाली घेताना कित..कित..कित.. कित.. कित.. असे शब्द उच्चारत भाजपाला फक्त 230 जागा जिंकता आल्या असे सांगण्याचा प्रयत्न केला. बॅनर्जी यांच्या या इशाऱ्याने संसदेत एकच हशा पिकला. तृणमूल काँग्रेसच्या तसेच इतर खासदारांना हसू आवरले नाही. यामध्ये खासदार महुआ मोईत्रा यादेखील होत्या. बॅनर्जी यांच्या या आगळ्यावेगळ्या अॅक्शनची सगळीकडे एकच चर्चा रंगली होती.
राहुल गांधींचेही जोरदार भाषण
दरम्यान, 1 जुलै रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांना घेरलं. त्यांनी जीएसटी, अग्नीवीर योजना, शेतकरी आंदोलन, नोटबंदी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. 2 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना भाषणाच्या माध्यमातून उत्तर देण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
'लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरतीच', विरोधकांना शंका; सरकारनं दिलं स्पष्टीकरण