Punjab Election 2022: पंजाबचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवेल : नवज्योत सिंह सिद्धू
जनता आमदारांना निवडून देते, मग जनताच पंजाबचा मुख्यमंत्री कोण ते ठरवेल असे वक्तव्य पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले आहे.
Punjab Election 2022 : निवडणूक आयोगाने 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे सध्या चर्चेत आहेत. सिद्धू त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांना आगामी काळात पंजाबचा मुख्यमंत्री कोण? असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता, सिद्धू यांनी सांगितले की, जनता आमदार निवडून देते, मग जनताच पंजाबचा मुख्यमंत्री कोण ते ठरवेल असे सिद्धू म्हणाले. तसेच पंजाबमध्ये माफियाराज सुरू असल्याचे म्हणत एक प्रकारे त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे माफीयाराज संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सिद्धू म्हणाले.
पंजाबचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत हायकमांड निर्णय घेणार नाही तर पंजाबची जनता मुख्यमंत्री कोण ते ठरवणार आहे. पंजाबच्या कल्याणामध्येच माझे कल्याण आहे. मला पंजाबच्या परिवाराची चिंता असल्याचे सिद्धू म्हणाले. काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत राहणार असल्याचेदेखील ते म्हणाले. यावेळी सिद्धू यांनी प्रकाशसिंह बादल आणि अमरिंदर सिंह यांच्यावही टीका केली. मागच्या 25 या दोघांनी आपले व्यवसाय प्रोटेक्ट करायचे काम केले. पंजाबच्या हिताची त्यांनी कत्तल केली आहे. पंजाबची सत्ता 3 ते 4 परिवावारमध्ये वाटली गेली आहे. केवळ 1 टक्केच लोक श्रीमंत झाली असल्याचे यावेळी सिद्धू म्हणाले.
पंजाबच्या विकासासाठी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आहोत. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश केला असल्याचे सिद्धू म्हणाले. विशेषत महिलांच्या बाबतीत अनेक चांगल्या योजना आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिद्धू यावेळी म्हणाले. काँग्रेस पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा का देत नाह, असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले की याबाबत मी सांगू शकत नाही. ते हायकमांड सांगेल. राजकारण मुद्यावर व्हायला हवे चेहऱ्यावर नको. मी जे काही करेल ते पंजाबसाठीच करणार आहे. माझ्या नशिबात जे लिहले आहे. मी कायम पंजाबच्या कल्याणसाठी प्रार्थना करत असल्याचे सिद्धू यावेळी म्हणाले.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची घोडदौड सुरु झाली आहे. आणखी एका ठिकाणी पक्षाकडून असं सांगण्यात आलं आहे की, काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, परंतु निवडणुकीनंतर पक्ष मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं याचा निर्णय घेईल. या सर्व घडामोडींमुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की, पंजाबमध्ये येणाऱ्या निवडणुकींमध्ये काँग्रेसनं कोणता चेहरा पुढे करुन निवडणूक लढवली पाहिजे? ABP News ने C-Voter सोबत पंजाबच्या जनतेसमोर हा प्रश्न उपस्थित केला. सर्व्हेमध्ये लोकांना जेव्हा विचारण्यात आलं की, पंजाबमध्ये काँग्रेसला कोणत्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली पाहिजे? त्यावेळी 42 टक्के लोकांनी म्हटलंय की, काँग्रेसनं मुख्यमंत्री चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं पाहिजे. दुसरीकडे, 23 टक्के लोकांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यास सहमती दर्शवली. मात्र, या दोघांच्या चेहऱ्यावर काँग्रेसने निवडणूक लढवू नये, असं केवळ 23 टक्के लोकांनी सांगितलं. तर 12 टक्के लोकांनी आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं.