Operation Sindoor : ओवैसी, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी ते श्रीकांत शिंदेंपर्यंत; 'ऑपरेशन सिंदूर'ची यशोगाथा 'खासदारांची टीम इंडिया' अवघ्या जगाला सांगणार! पाकिस्तानला टप्प्यात घेरण्याची तयारी
Operation Sindoor : केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असतील. यापैकी एक खासदार गटाचे नेतृत्व करेल.

Operation Sindoor : दहशतवादाला खतपाणी घालून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत 'ऑपरेशन सिंदूर'मधून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले. यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने तगडा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असतील. यापैकी एक खासदार गटाचे नेतृत्व करेल. संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी टीम नेत्यांची नावे जाहीर केली. भाजपचे दोन, काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राष्ट्रवादी (सपा) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी (सपा) च्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व करतील.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देणार
खासदारांचे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देईल. तेथे ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील. खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध का आणि कसे कारवाई केली हे स्पष्ट करेल.
शिष्टमंडळात 4 काँग्रेस खासदारांची नावे
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, 'शुक्रवारी (16 मे) सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी 4 खासदारांची नावे देण्यास सांगितले. काँग्रेसने 4 नावे दिली आहेत. यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांचा समावेश आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 10 दिवसांत 5 ते 8 देशांमध्ये शिष्टमंडळ जाईल
खासदारांचे शिष्टमंडळ कोणत्या देशांमध्ये जाईल हे अद्याप कळलेले नाही. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खासदारांच्या प्रत्येक पथकात 5 सदस्य असतील, जे सुमारे 10 दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 देशांना जातील. 23 किंवा 24 मे रोजी शिष्टमंडळ निघण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, 'पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेल्या खासदारांच्या टीम ऑपरेशन सिंदूरबाबत जगासमोर भारताची बाजू मांडतील. जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वजण एकत्र असतो आणि इतर देशांमध्ये जाऊन आपल्या देशाची बाजू मांडतो.'
अनुराग ठाकूर-ओवैसी शिष्टमंडळात
वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रानुसार, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ओडिशाच्या भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची नावे शिष्टमंडळात समाविष्ट आहेत. इतर पक्षांच्या खासदारांच्या नावांचा विचार केला जात आहे ज्यात तृणमूल काँग्रेसचे सुदीप बन्योपाध्याय, बीजेडीचे सस्मित पात्रा, सीपीआय-एमचे जॉन ब्रिटास आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना ठार मारले. 7 मे रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. सैन्याने 100 दहशतवादी ठार केले. दोन्ही देशांनी 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या























