एक्स्प्लोर
Advertisement
शशीकला वि. पन्नीरसेल्वम : राज्यपाल विद्यासागर राव चेन्नईला जाणार
चेन्नई : तामिळनाडूतील राजकीय घडामोडींनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव चेन्नईसाठी उद्या (गुरुवार) सकाळी रवाना होणार आहेत. राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शशीकला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी आपल्याला राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप झाला होता. आता एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव यांनी 130 आमदारांचा गट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावला आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबईतून चेन्नईत जाईपर्यंत या आमदरांना हॉटेलमध्येच ठेवलं जाणार आहे. आमदारांनी पन्नीरसेल्वम यांना समर्थन देऊ नये, यासाठी शशीकला नटराजन यांनी ही नवी खेळी खेळली असल्याचं बोललं जात आहे.
काय आहेत पन्नीरसेल्वम यांचे आरोप?
पन्नीरसेल्वम यांनी मंगळवारी सायंकाळी जयललितांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. मी मुख्यमंत्री व्हावं, अशी अम्मांची इच्छा होती, पण दबाव टाकून माझ्याकडून राजीनामा घेतला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पन्नीरसेल्वम यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत जाहीरपणे सांगितलं. शिवाय राज्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, तर राजीनामा मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शशिकला नटराजन यांचा शपथविधी बुधवारी होणार नाही, अशी माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे त्यांचा शपथविधी होईपर्यंत पन्नीरसेल्वमच मुख्यमंत्री राहतील, हे स्पष्ट झालं होतं. मात्र पन्नीरसेल्वम अम्मांच्या समाधीस्थळी जाऊन ध्यानमग्न झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा पारा एकदमच चढला होता.
अपोलो रुग्णालयात अम्मांवर उपचार चालू होते, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं होतं. इच्छा नसतानाही पक्षासाठी मुख्यमंत्री झालो. मात्र शपथविधी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसातच शशिकला यांच्या पुतण्याने शशिकला पक्षाच्या महासचिव व्हाव्यात, अशी इच्छा बोलून दाखवली होती, असा खुलासाही पन्नीरसेल्वम यांनी केला.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्यासाठी पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली.
जयललितांच्या मृत्यूची चौकशी करा, पन्नीरसेल्वम यांचे आदेश
ओ. पन्नीरसेल्वम यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तपासाची सूत्रं निवृत्त न्यायाधीशांकडे असतील. आपण पक्षाला कुठलाही दगा दिला नसल्याचं स्पष्टीकरणही पन्नीरसेल्वम यांनी दिलं आहे. गावागावांमध्ये जाऊन पक्षाच्या बांधणीसाठी काम करत जयललितांच्या मार्गावरच चालणार असल्याचं पन्नीरसेल्वम यांनी म्हटलं आहे.
पन्नीरसेल्म यांचं पक्षातून निलंबन होणार?
पन्नीरसेल्वम यांच्या गौप्यस्फोटानंतर पक्षाच्या महासचिव शशीकला यांनी अर्ध्या रात्री बैठक बोलावून पन्नीरसेल्वम यांना पक्षाच्या कोषाध्यक्ष पदावरुन हटवलं. त्यानंतर त्यांचं पक्षातूनही निलंबन केलं जाऊ शकतं, असा अंदाज लावला जात आहे. कारण त्यांनी जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शशीकला आणि पन्नीरसेल्वम यांच्या युद्धात पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.
कसं आहे तामिळनाडू विधानसभेचं गणित?
तामिळनाडूच्या जनतेचा पाठिंबा पन्नीरसेल्वम यांना असल्याचं चित्र आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी पन्नीरसेल्वम यांना आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी 134 जागा एआयएडीएमके पक्षाकडे आहेत.
बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. मात्र पन्नीरसेल्वम यांनी आपल्याला आतापर्यंत 50 आमदारांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्ष डीएमकेकडे सध्या 89 जागा आहेत. त्यामुळे पन्नीरसेल्वम आणि डीएमके एकत्र आल्यास 139 जागांसह नवं सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. मात्र सध्या केवळ या विषयाची तामिळनाडूत चर्चा सुरु आहे. कारण डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा दर्शवला आहे.
शशीकलांबाबत सस्पेंस का?
पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा देऊन दोन दिवस झाले आहेत. मात्र शशीकला मुख्यमंत्री होणार का, याबाबत सस्पेंस कायम आहे. कारण राज्यपाल विद्यासागर राव अजूनही मुंबईतच आहेत. ते चेन्नईत गेल्यानंतर शशीकला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, याबाबत राजकीय हालचाली होतील.
केंद्र सरकारचं मत काय?
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक सहा महिन्यात होणार आहे. त्यामुळे एआयएडीएमकेचे 52 खासदार आणि 134 आमदार भाजपने दिलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी केंद्र सरकारची अपेक्षा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मात्र एआयएडीएमके पक्षात फूट पडल्यास नव्या समीकरणांनुसार कोण कुणाला पाठिंबा देणार याबाबत सस्पेंस आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातमी :
जयललितांच्या मृत्यूची चौकशी करा, पन्नीरसेल्वम यांचे आदेश
मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकला : पन्नीरसेल्वम
शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री
जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री – ओ पन्नीरसेल्वम!
जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशिकला कोण?
जयललिता यांच्यानंतर AIADMK ची धुरा शशिकला यांच्याकडे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement