करूणानिधी यांची प्रकृती खालावली
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती खालावली आहे. पुढील 24 तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती खालावली आहे. चेन्नईतील कावेरी रूग्णालयानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटीननुसार पुढील 24 तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच रूग्णालयाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.
करूणानिधी यांच्यावर 29 जुलैपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील करुणानिथी यांची भेट घेण्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत.
रूग्णालयानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटीननुसार, करुणानिधी यांच्या वयोमानानुसार अवयव योग्यरित्या काम करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. डॉक्टरांची एक टीम करुणानिधी यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून आहे आणि अॅक्टिव्ह मेडिकल सपोर्टच्या साह्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय उपचारांना ते कसे प्रतिसाद देतात यावर त्यांची प्रकृती अवलंबून आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आधीच करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.