Tamil Nadu Election 2021: आता गृहिणींना मिळणार मासिक वेतन, कमल हसन यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासन
गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतनाच्या श्रेणीत आणून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा निर्णय कमल हसन (Kamal Haasan) यांच्या मक्कल नीधी मय्यम (MNM) पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे.
चेन्नई: दिवसभर घरातील काम करणाऱ्या गृहिणींचे काम दुर्लक्षित राहतं किंवा आपल्या समाजात त्याचं मूल्य केलं जात नाही. यावर अनेक स्त्रीवाद्यांनी आणि विविध संघटनांनी आतापर्यंत आवाज उठवला आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कमल हसन यांच्या मक्कल नीधी मय्यम या पक्षाच्या जाहीरनाम्यात तामिळनाडूतील गृहिणींना आता महिन्याकाठी आर्थिक वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
पुढील वर्षी तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कमल हसनच्या मक्कल नीधी मय्यमने प्रचार सुरु केला असून आपला आर्थिक अजेंडा जनतेसमोर मांडला आहे. यामध्ये तामिळनाडूतील गृहिणींच्या कामाला मूल्य देण्याचं ठरवलं असून त्यांना महिन्याकाठी आर्थिक वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
मक्कल नीधी मय्यमच्या जाहीरनाम्यात गृहिणींना आर्थिक वेतनाच्या श्रेणीत आणण्याचं आश्वासन दिल्यानं स्त्रीयांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. तसेच यासंबंधी अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शिक्षण, रोजगार आणि उद्योग यांच्यामार्फत स्त्रियांचे सबलीकरण करण्यात येईल असं मक्कल निधी मय्यमच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. महिला घरी करत असलेलं काम समाजाकडून दुर्लक्षित केलं जातं, त्यांच्या कामाला मूल्य दिलं जात नाही. तसंच या कामाचं योगदानही लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे या दुर्लक्षित पण महत्वपूर्ण कामाला आता मान्यता देण्यात येणार असून त्यांना मासिक वेतन देण्यात येईल असं पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. यासंबंधी पक्षाच्या वतीनं सात कलमी सुशासन आणि आर्थिक अजेंडा मांडण्यात आला आहे.
MNM चे नेते कुमारवेल म्हणाले की, "गृहिणी या समाज निर्मीतीत महत्वपूर्ण योगदान देत असूनही त्यांच्या कामापैकी 90 टक्के काम दुर्लक्षित राहतं. गृहिणींच्या या योगदानाला किती प्रमाणात वेतन द्यायचं हे ठरवण्यासाठी अभ्यास सुरु आहे, पण लवकरच यावर निर्णय होईल अशी आशा आहे. सरकारतर्फे पोंगलच्या सणाच्या वेळी प्रत्येक कुटुंबाला 2500 रुपये देण्यात येतात. पण ते पैसे कुटुंबातील महिलांना न मिळता पुरुषांकडून खर्च केले जातात. त्यामुळे आता थेट गृहिणींनाच त्यांच्या कामाचं वेतन द्यायचं आम्ही ठरवलं आहे."
थोडक्यात सांगायचं तर मक्कल नीधी मय्यम पक्षाने गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतनाच्या श्रेणीत आणायचं ठरवलं आहे. यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना समान संधी प्राप्त होतील.या व्यतिरिक्त MNM पक्षाने इंटरनेटचा अधिकार हा मानवी अधिकार समजला जाईल असेही आश्वासन दिलं आहे.
शशी थरुर यांचा पाठिंबा कॉग्रेस नेते शशी थरुर यांनी कमल हसन यांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "गृहिणींच्या कामाला आर्थिक वेतन देण्याच्या कमल हसन यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे गृहिणींच्या सेवेला मूल्य मिळेल आणि समाजात त्यांच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच यामुळे महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होईल."
I welcome @ikamalhaasan’s idea of recognising housework as a salaried profession, w/the state govt paying a monthly wage to homemakers. This will recognise & monetise the services of women homemakers in society, enhance their power& autonomy & create near-universal basic income.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 5, 2021
संबंधित बातम्या:
- Rajinikanth Exits Electoral Politics : प्रवेशापूर्वीच सक्रिय राजकारणापासून रजनीकांत यांचा दुरावा
- Ola सुरु करणार जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी, तामिळनाडूत 2400 कोटींची गुंतवणूक
- CBI कस्टडीतून तब्बल 103 किलो सोनं गायब, मद्रास उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
- अमित शाहांच्या 'एक राष्ट्र एक भाषे'बाबतच्या वक्तव्यानंतर कमल हासन यांची संतप्त प्रतिक्रिया