"सर्वोच्च न्यायालयावर टीका करुन कायदामंत्र्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये"; किरेन रिजिजूंवर हरिश साळवेंनी साधला निशाणा
Supreme Court and Government Tussle: कायदामंत्री रिजिजू यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले, कायदामंत्री जे काही बोलले, त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली असं मला वाटतं.
Supreme Court and Government Tussle: सध्या केंद्र सरकार (Central Government) आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी सुरू आहे. मग कॉलेजियमच्या शिफारशींचं पालन न करणं असो किंवा मग निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचं प्रकरण, या सर्व मुद्द्यांवरून तणाव सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. आता ज्येष्ठ वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्यात त्यांनी कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये, असं म्हणत साळवे यांनी निशाणा साधला आहे. यावरुन केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील वाद आता चिघळत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्रकरण नेमकं काय?
काही दिवसांपूर्वीच सरकारकडून अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडे या नियुक्तीसंदर्भातील संपूर्ण तपशील मागितले होते. तसेच, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत हा निर्णय कसा घेतला गेला, अशी विचारणाही केली होती. अरुण गोयल यांना निवृत्तीनंतर लगेचच या पदावर बसवल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. जे नियमांच्या विरुद्ध आहे. त्याच वेळी, सरकारनं उत्तर दिले की, यापूर्वीही असं घडलं आहे आणि कोणत्याही नियमांच उल्लंघन केलं गेलेलं नाही.
काय म्हणाले कायदामंत्री किरेन रिजिजू?
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरुन आता ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कायदामंत्र्यांबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यावरुन सध्या देशभरात चर्चांना उधाण आलं आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारला खडे बोल सुनावले असता कायदामंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिजिजू म्हणाले होते की, "हा कसला प्रश्न आहे? तसे असेल तर कॉलेजियम न्यायाधीशांची नावं कशी निवडते, असा प्रश्नही पुढे लोक विचारू शकतात. यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालाद्वारे बोललं पाहिजं आणि अशा प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे."
आता कायदामंत्र्यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी एका कार्यक्रमादरम्यान रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडल्याचं म्हटलं आहे. बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, हरिश साळवे म्हणाले की, "मला वाटतं की, कायदेमंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय, ते बोलून त्यातून लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. जर कायदामंत्र्यांना असं वाटत असेल की, सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं आणि कायद्यात सुधारणा करण्यासाठी सरकारच्या दयेवर अवलंबून राहायला हवं, तर माफ करा, हे पूर्णपणे चुकीचं आहे."
आपल्या भाषणादरम्यान साळवे यांनी राजद्रोह कायद्याचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं राजद्रोह कायदा रद्द करावा, असं म्हटलं आहे. कारण त्यांच्या मते हा वसाहतवादी कायदा (Colonial Law) होता, जे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.