Agneepath: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध; विद्यार्थ्यांचे आंदोलन, बक्सरमध्ये रेल्वेवर दगडफेक, जाळपोळ
Protest Against Agneepath: बिहारमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला बिहारमध्ये विरोध करण्यात येत आहे. शेकडो विद्यार्थी-युवक रस्त्यावर उतरले आहेत.
Protest Against Agneepath: केंद्र सरकारने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेवर बिहारमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला आहे. या योजनेच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. बक्सरमध्ये युवकांकडून ट्रेनवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. तर, मुझफ्फरपूरमध्येही आंदोलन सुरू असल्याचे वृत्त आहे. तर, काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना 'अग्नवीर' असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. 'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने युवक बक्सर रेल्वे स्थानकाजवळ पोहचले होते. त्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठाण मांडले. या आंदोलनामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस जवळपास एक तास थांबली.
या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी पाटणा येथे जाणारी पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक केली. रेल्वे पोलिसांकडून रेल्वे रुळावरून आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नवीन योजनेवर प्रश्नचिन्ह
चार वर्ष सेवा बजावल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना लष्करात कायम स्वरुपी नोकरी देण्यात येणार आहे. मात्र, दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या अग्नीवीर झालेल्या 75 टक्के युवकांकडे कोणता पर्याय असणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चार वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या युवकांना जवळपास 12 लाख रुपयांचा सेवा निधी देणार आहे. मात्र, या युवकांना पर्यायी रोजगार देण्यासाठी कोणती योजना सरकारकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.