Congress President | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड
महाराष्ट्राचे मुकूल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे यांची नावं संध्याकाळपर्यंत अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र अचानक सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुकूल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे यांची नावं अध्यक्षपदासाठी संध्याकाळपर्यंत चर्चेत होती. मात्र अचानक सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकलं नाही, त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला पूर्णवेळ नवा अध्यक्ष कधी मिळणार अशी चर्चाही सुरु झाली आहे. येत्या काळात देशात झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोनिया गांधी यांनी याआधी 19 वर्ष यशस्वीपणे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत 1998-99 साली सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं आणि पक्षाला योग्य दिशा दाखवली होती. सध्याची काँग्रेसची स्थितीही तशीच आहे. त्यामुळे सोनिया गांधींच्या रुपाने पक्षाला नवी उभारी मिळेल, अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
