Shivraj Singh Chouhan : राज्याभिषेक होतोय असं वाटत असताना अनेकवेळा वनवास भोगावा लागतो, शिवराज सिंह यांचं दुःख, बंगल्याचं नवीन नाव 'मामा का घर'
Shivraj Singh Chouhan : प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं, आता आपल्याला मुख्यमंत्री न करण्यामागेही काही मोठा हेतू असेल असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.
भोपाळ: पाचपैकी तीन राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर तीनही ठिकाणी भाजपने धक्का देत नवीन मुख्यमंत्री दिले. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांचे पाचव्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. त्याचं दुःख अजूनही शिवराज सिंह चौहानांना (Shivraj Singh Chouhan) असल्याचं दिसून येतंय. राज्याभिषेक होणार असं वाटत असताना अनेकदा वनवास भोगावा लागतो असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं. तसेच आपल्याला मुख्यमंत्री न करण्यामागे काहीतरी मोठा हेतू असेल असंही ते म्हणाले.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राज्याभिषेक होईल असं वाटत असताना अनेक वेळा वनवास मिळतो. त्यामागेही काही ना काही उद्देश असतो. आताही आपल्याला मुख्यमंत्री न करण्यामागे काहीतरी मोठा हेतू असेल.
जनतेच्या वेदना दूर करण्यासाठी पृथ्वीवर आलो
राजधानी भोपाळमध्ये आयोजित रॅलीदरम्यान माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, काळजी करू नका, माझे जीवन जनतेसाठी आहे. यापुढेही राज्यातील जनतेसाठी काम करणार. लोकांच्या जीवनातील दु:ख, वेदना दूर व्हाव्यात यासाठीच आपण पृथ्वीवर आलो आहोत.
राज्यातील जनतेच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही आणि राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचं शिवराज सिंह चौहान म्हणाले. आपण जनतेसाठी अहोरात्र काम करण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले. आपलेले जीवन जनतेसाठी समर्पित असून आपण सदैव जनतेच्या पाठीशी राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बंगल्याला 'मामा का घर'नाव
शिवराज सिंह चौहान यांनी रॅलीत आपल्या नवीन बंगल्याचा पत्ता आणि नावही सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांच्या बंगल्याचा नवीन पत्ता बी-8, 74 असा आहे. त्याचे नाव 'मामा का घर' असं आहे. शिवराज सिंह यांच्या नवीन बंगल्याच्या मुख्य गेटवर एका बाजूला त्यांच्या नावाची पाटी आहे, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या अक्षरात 'मामा का घर' लिहिलेलं आहे.
शिवराज सिंह मामा नावाने प्रसिद्ध
शिवराज सिंह चौहान 2005 मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते, तेव्हापासून त्यांनी सलग 15 वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते राज्यातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते. विशेषत: त्यांचे महिलांसोबतचे भावा-बहिणीचे नाते असल्यामुळे ते राज्यात मामा म्हणून प्रसिद्ध आहेत.शिवराज सिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ही बातमी वाचा: