ShivJayanti 2023: आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात संतप्त शिवप्रेमींची दिल्ली हायकोर्टात धाव
Shivjayanti 2023: आग्रा किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मग शिवजयंती बाबत भेदभाव का असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे
नवी दिल्ली : आग्रा किल्ला (Agra Fort) परिसरात शिवजयंतीला (ShivJayanti 2023) परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासीक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली असा संतप्त सवाल अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.
शिवजयंतीला परवानगी नाकारताना पुरातत्व विभागानं ( Archeology Department Denies Permissin) कोणतंही कारण दिलेलं नाही. मुळात किल्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळेच पुरातत्व विभाग पक्षपातीपणा आणि मनमानीपणा करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्रही दिलं होतं. एवढचं नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांची तीनवेळा भेटही घेतली. तरीही परवानगी नाकारली. आग्र्यामध्येच छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद आणि त्यातून महाराजांची ऐतिहासिक सुटका या पराक्रमी घटनेला उजळणी देण्यासाठी शिवप्रेमींचा आग्र्यात शिवजयंती साजरा करण्याचा मनोदय होता. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाकडून चालढकल होत असल्याने अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि युवराज संभाजी (Sambhaji Maharaj) यांना नजरकैदेत ठेवलं होतं. शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली होती. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात (Maratha History) अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा करण्याची परवानगी मिळेल असा विश्वास याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला आहे
संबंधित बातम्या :