जसे हिरोज, तशाच 'शीरोज'! लखनौमधील अनोख्या कॅफेची देशभर चर्चा, अॅसिड अटॅक झालेल्या मुलींची प्रेरणादायी कहाणी
sheroes cafe lucknow : ही गोष्ट आहे लखनऊमधील एक अशा कॅफेची. जिथं सगळा कारभार अशाच मुलींच्या हातात आहे, ज्यांच्यावर कधी काळी असा हल्ला झाला होता. त्याचं नाव आहे शीरोज.
लखनौ : कॅफे हा शब्द ऐकला तरी एखादं हॉटेल आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि अॅसिड अटॅक हा शब्द ऐकला तर एक विद्रुप झालेला चेहरा…आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य डोळ्यासमोर येत. आता तुम्ही म्हणाल की कॅफे आणि अॅडिस अटॅकचा काय संबंध. तर मग ऐका, गोष्ट आहे लखनऊमधील एक अशा कॅफेची. जिथं सगळा कारभार अशाच मुलींच्या हातात आहे, ज्यांच्यावर कधी काळी असा हल्ला झाला होता. आणि त्याचं नाव आहे शीरोज.
आयुष्यात छोट्या मोठ्या अपयशानं आपण खचून जातो..मागे पडतो, निराशा मनात भरते..पण मी आता अशा ठिकाणी आहे जिथं जगण्याची नवी उमेद मिळते.
ज्यांच्या शरीरावर अॅसिडचे घाव असतात त्यांच्या मनावर त्यापेक्षाही मोठा आघात झालेला असतो. एका क्षणात त्यांची स्वप्न उद्ध्वस्त झालेली असतात. एका क्षणात ज्यांचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं अशा अॅसिड हल्ला झालेल्या मुलींचं आयुष्य कसं असेल. याचा आपण सर्वसामान्य फक्त विचार करु शकतो. आपल्यातलेच काही जण दयेपोटी त्यांची मदतही करत असतील. पण, 'शीरोज' हे असं ठिकाण आहे. जिथं अशा मुलींना जगण्याची नवी उमेद दिली जाते.
जिथं अॅसिड अटॅक झालेल्या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जातं.
एबीपी माझानं या शीरोज कॅफेला भेट दिली त्यावेळी या शीरोजशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी उलगडल्या. आधी भीती होती पण नंतर विश्वास वाढला, असं शीरोज सांगतात. छाव फाऊंडेशननं 2014 साली आग्र्यात पहिलं शीरोज सुरु केलं. नंतर 2017 साली लखनऊमध्ये डॉ.अंबडेकर पार्कसमोर दुसरं शीरोज सुरु केलं. आता इथं 16 शीरोज आहेत. त्याच हे कॅफे चालवतात. .
लखनऊबाहेरूनही अनेक जण या कॅफेमध्ये येत असतात. कोरोनाचा काळ कॅफेसाठी अत्यंत कठीण होता, अनेक समस्यांचा सामना या काळात शीरोजला करावा लागला.
आज कॅफेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. कॅफेमध्ये एक ओपन बेकरीही सुरु होत आहे. इथल्या शीरोजनी फक्त सहा दिवसांच्या प्रशिक्षणातून बेकरी प्रोडक्ट्स शिकले.
यांच्यातला उत्साह आणि शिकण्याची इच्छा सर्वसामान्यांनाही लाजवेल अशीच आहे. यांची दुख: पाहिल्यानंतर कदाचित आपल्याला आपली दुख छोटी वाटतील. आणि या मुलींची दया येईल. पण, यांना गरज आपल्या दयेची नाही तर आपल्या साथीची आहे.