Weather Today : पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान खात्याने वर्तवला अंदाज
IMD Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.
![Weather Today : पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान खात्याने वर्तवला अंदाज severe cold wave in next three days in northwest india IMD Rain prediction in south india marathi news Weather Today : पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान खात्याने वर्तवला अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/66eb92e76b42287463e6ab3c676b42101705225436675906_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Update Today : देशात आता थंडीचा (Winter) पारा आणखी घसरणार आहे. पुढील काही दिवसात देशातील तापमानात घट (Cold wave) होताना पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.
पुढील 48 तासात तापमानात घट होणार
मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. राजस्थान, दिल्लीमध्ये थंडीची स्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीची शक्यता
आज उत्तरेकडील राज्य पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या भागात दाट धुके पसरण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. गेल्या 24 तासात जम्मू-काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद या भागात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. दरम्यान पुढील 48 तासात काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
थंडी आणि धुक्यापासून दिलासा नाहीच
सध्या डेहराडूनसह मैदानी भागात दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. बद्रीनाथ धाम आणि हेमकुंड साहिबच्या पर्वतीय भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे सखल भागात थंडीची लाट आली आहे. कोरडे हवामान आणि थंड वाऱ्याने संपूर्ण राज्यात कहर केला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके असून त्यामुळे हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. दहा वाजल्यापासून हलका सूर्यप्रकाश आल्याने तापमानात किंचित वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर संध्याकाळ जवळ आली तसतसे थंडी पुन्हा एकदा वाढते.
उत्तर भारतात पुढील दोन ते तीन दिवस दाट ते जास्त दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात 17 डिसेंबरपर्यंत पहाटे आणि रात्री दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)