Yasin Malik Hunger Strike : तिहार जेलमध्ये दहशतवादी यासीन मलिकचं उपोषण; समोर ठेवल्या 'या' मागण्या
Yasin Malik Hunger Strike : दहशतवादी यासीन मलिक तिहार जेलमध्ये उपोषणाला बसला आहे.
Yasin Malik Hunger Strike : दिल्लीतील (Delhi) तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (Jammu and Kashmir Liberation Front) प्रमुख यासीन मलिक (Yasin Malik) तुरुंगातच उपोषणाला (Hunger Strike) बसला आहे. दहशतवादी यासीन मलिकचं म्हणणं आहे की, त्याच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरु नाही, त्यामुळेच त्यानं तुरुंगातच उपोषण सुरु केलं आहे. यासीन मलिक याच्याशी बोलण्यासाठी तुरुंगातील वरिष्ठ अधिकारीही आले, मात्र त्यानं उपोषण सोडण्यास नकार दिला. .
यापूर्वी, 13 जुलै रोजी, मलिकनं माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद (Mufti Mohammad Sayeed) यांची मुलगी रुबिया सईद (Rubia Sayeed) हिच्या अपहरणाशी संबंधित प्रकरणातील साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी दिल्लीतील विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचं मलिकनं सांगितलं होतं.
मलिक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर
मलिक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर झाला होता. आपण सरकारला पत्र लिहून कोर्टात हजर राहण्याची परवानगी मागितल्याचं त्यावेळी मलिकनं कोर्टात सांगितलं होतं. दरम्यान, हे प्रकरण 8 डिसेंबर 1989 रोजी रुबिया सईदच्या अपहरणाशी संबंधित आहे. त्यावेळी केंद्रात भाजप समर्थित व्हीपी सिंह सरकार होतं. सरकारनं जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या (जेकेएलएफ) पाच दहशतवाद्यांना सोडल्यानंतर अपहरणकर्त्यांनी रुबियाची सुटका केली होती.
या प्रकरणात मलिकला जन्मठेपेची शिक्षा
काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्ली न्यायालयानं (Court) 25 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 'दहशतवादी' कारवायांसाठी (Terrorist Activities) निधी उभारल्याबद्दल मलिकला शिक्षा सुनावण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
जम्मू-काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे रुबिया सईद यांचे अपहरण झाले होते. मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू-काश्मीरचे मोठे नेते आणि नंतर ते मुख्यमंत्रीही झाले. मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या बातमीनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. रुबिया सईद यांच्या सुटकेसाठी सरकारनं 5 दहशतवाद्यांची सुटका केली होती. या संपूर्ण घटनेत जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याचा हात होता, असा आरोप आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :