Sahara Refund: गुंतवणूकदारांच्या खात्यात सहारा रिफंडचे पैसे जमा; गृहमंत्री अमित शहांनी केले हस्तांतरित
Sahara Refund Portal: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (4 ऑगस्ट) दिल्लीत सहारा रिफंड पोर्टलद्वारे सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम हस्तांतरित केली.
Sahara Refund Portal: सहारा इंडियाच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी (Sahara India Investors) एक दिलासादायक बातमी. वर्षानुवर्षे अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी केंद्र सरकारनं सहारा रिफंड पोर्टल सुरू केलं होतं, ज्यावर लाखो गुंतवणूकदारांनी पैसे मिळवण्यासाठी अर्ज केले होते. शुक्रवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची रक्कम सहारा रिफंड पोर्टलद्वारे हस्तांतरित केली आहे.
15 लाखांहून अधिक लोकांनी केली नोंदणी
सहारा समूहाच्या (Sahara India) को-ऑपरेटिव्हमध्ये गुंतवणूकदारांचे अडकलेले कोट्यवधी रुपये परत करण्यासाठी केंद्र सरकारनं सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी (CRCS) पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलद्वारे ज्या गुंतवणूक दारांच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे, त्याच गुंतवणूक दारांना पैसे परत मिळू शकणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपये गुंतवणूकदारांना परत केले जातील. ज्यांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना देखील फक्त 10 हजार रुपयेच परत केले जातील.
#WATCH | Union Home and Cooperative Minister Amit Shah transfers the claim amount to the depositors of cooperative societies of the Sahara group through the Sahara Refund Portal in Delhi pic.twitter.com/Hmfm9IqPMP
— ANI (@ANI) August 4, 2023
अमित शहांकडून गुंतवणूकदारांची रक्कम हस्तांतरित
सहारा रिफंड पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांची संख्या सातत्यानं वाढत आहे. सहारा रिफंड पोर्टल लाँच करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले होते की, 45 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचतील आणि आता सहाराच्या को-ऑपरेटिव्हमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या कामाची सुरुवातही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याच हस्ते करण्यात आली.
112 लाभार्थ्यांच्या खात्यात परतावा
सहाराच्या गुंतवणूकदारांची रक्कम हस्तांतरित करताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, सहाराच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार, आज प्रत्येकी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता 112 लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आला आहे. यासोबतच या पोर्टलद्वारे आतापर्यंत परताव्यासाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांची आकडेवारी सादर करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सहारा रिफंड पोर्टल सुरू झाल्यापासून 18 लाख लोकांनी त्यावर नोंदणी केली आहे.
'या' सोसायट्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार
सहकार मंत्रालयानं सहारा समूहाच्या सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले आहेत, त्यांना परतावा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं 5 हजार कोटी रुपये सीआरसीएसकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.
रिफंड प्रोसेसला लागणार 45 दिवस
केंद्र सरकारनं सहारा रिफंड पोर्टल सुरू केलं आहे. त्यावर, सहारा गुंतवणूकदार स्वत: लॉग इन करून त्यांची नावं नोंदवू शकतात. नोंदणीनंतर पडताळणी होईल आणि त्यानंतर परताव्याची प्रक्रिया सुरू होईल. पैसे परत करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया 45 दिवसांत पूर्ण होईल. अर्ज केल्यानंतर, सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची सहारा समूहाच्या समित्यांकडून 30 दिवसांत पडताळणी केली जाईल आणि त्या गुंतवणूकदारांना ऑनलाईन दावा दाखल केल्यानंतर 15 दिवसांच्या आत एसएमएसद्वारे कळवलं जाईल.